Vantara on Mahadevi Elephant: कोल्हापुरातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आल्यानंतर रोष व्यक्त होत आहे. यादरम्यान वनताराने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरु केला आहे अशी माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे. तसंच आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हेत, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे असं सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
“कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ मधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणीसोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते. आम्ही ओळखतो की तिथे उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती. आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली. ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हेत, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे,” असं वनताराने सांगितलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली”.
“जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरु केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्य तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरी च्या कल्याणसोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल,” असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
“वनतारा कोणताही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारांसाठी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
FAQ
महादेव हत्तीण कोण आहे?
महादेवी हत्तीण फक्त चार वर्षांची असताना नांदणीच्या मठात दाखल झाली होती. तब्बल 32 वर्षांनी तिचा कोल्हापुरातील सहवास संपुष्टात आला आणि वनतारामध्ये जावं लागलं आहे.
महादेवी हत्तीणीला वनताराला का नेलं?
पेटाने महादेवी हत्तीणीच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत लढा गेला. अखेर तिला वनताराला पाठवण्याचा निर्णय देण्यात आला.
महादेवी हत्तीणीचं वय किती?
महादेवी हत्तीणीचं वय आज 36 वर्षं आहे. 1992 मध्ये चार वर्षांची असताना तिला नांदणी मठात आणण्यात आलं होतं.