राज्यात रविवारी दि. ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान पंधरवडा हाती घेण्यात आला असून या निमित्त जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
.
महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘अवयवदान पंधरवडा’ ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवली जाणार आहे. या कालावधीत व्यापक जनजागृती व समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दि. २८ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत दिले होते.
त्यानुसार या मोहिमेमध्ये शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. महाराष्ट्र सारख्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या व झेडटीसीसी, मुंबई, पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने हे अभियान राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
अवयवदान ही एक सामाजिक बांधिलकी आहे. समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडवण्यासाठी प्रभावी जनजागृती केली जाणार असून या मोहिमेतून अवयवदानासंबंधी भीती, गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
या पंधरवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व आरोग्य संस्था स्तरावर, शाळा, महाविद्यालये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी रूप दिले जाणार आहे.
‘अवयवदान पंधरवडा’मध्ये सोशल मिडिया जनजागृती मोहीम, अवयवदानावर ऑनलाइन व्याख्यान, रुग्णालय/क्लिनिकमध्ये क़्युआर कोड पोस्टर प्रदर्शन, ओपीडी प्रतीक्षागृहात आरोग्य विषयक मार्गदर्शन, मंदिरे व बाजारपेठांमध्ये माहितीपत्रक वाटप, शाळा/रुग्णालयांमध्ये संकल्प भिंत / झाड उभारणी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी जागरुकता सत्र, महाविद्यालयांमध्ये पोस्टर, रांगोळी स्पर्धा, बाजारपेठेत स्थानिक भाषेत पथनाट्य, आय सपोर्ट ऑर्गन डोनेशन बॅज डे, शाळांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा, स्थानिक कार्यक्रमात जनजागृती स्टॉल, अवयवदान जनजागृती रॅली असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून दि. १५ ऑगस्ट रोजी अवयवदात्यांच्या कुटुंबांचा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सत्कार जिल्हास्तरावर सत्कार करण्यात येणार आहे.
राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून, महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेणे हे या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या मोहिमेला जनतेच्या सक्रीय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.