Mumbai Sawali Dance Bar Row: सावली बारवरून अनिल परबांनी योगेश कदमांना चांगलंच कोंडीत पकडलं होतं. दरम्यान यानंतर कदम कुटुंबाकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत करण्यात आला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावानं डान्सबार चालवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.
सावली बारचा आता रेस्टोबार आणि हॉटेलचाच परवाना कायम ठेवण्यात आला आहे. तर ऑर्केस्ट्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परवाना रद्द केल्यास सुटका होत नाही, योगेश कदमांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी अनिल परबांनी केली. विरोधकांनी बार प्रकरणी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे सत्ताधा-यांनी डान्स बार प्रकरणी बोलायचं टाळल आहे. हा पोलीस चौकशीचा भाग आहे, त्यामुळे याच्यात हस्तक्षेप करणं योग्य नसल्याचं सत्ताधारी नेत्यांनी म्हटल आहे.
सावली बार प्रकरणावरुन पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केलेत आधी बार आमचा नाही असं म्हणाणारे आता थेट बार रद्द करण्याचं पत्र स्वत: देत असल्याची पोस्ट अंजली दमानियांनी केली. त्यामुळे काय खरं काय खोटं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. आधी बार आमचा नाही, परवाना आमचा नाही. डांस बार नाही ऑर्केस्ट्रा आहे, आम्ही चालवायला दिला आहे. आता थेट बार रद्द करण्याचे पत्र स्वतः देतात? काय खरं आणि काय खोटं? चोरी पकडली म्हणून हे पत्र, नसती पकडली, तर पत्र पाठवलं असतं का? सूत्र म्हणतात 35 वर्ष हा बार होता, 2023 मधे तीनदा रेड झाली. तेव्हा का रद्द केलं नाही? तेव्हा का पत्र लिहिले नाही? ज्या व्यक्तीला बार चालवण्यासाठी दिला होता, त्याच्यासोबतचा करारनामा देखील कदमांकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात योगेश कदमांना दिलासा मिळणार का? तसंच विरोधकांनी हा मुद्दा सातत्यानं लावून धरल्यामुळे योगेश कदमांवरही अॅक्शन घेण्यात येणार याकडे आता लक्ष लागलंय.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे योगेश कदम यांचे वडिल आहेत. महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरावायला लाज वाटत नाही का, असा सवाल परब यांनी उपस्थित केला होता. प्रकरण वाढताच मुंबई समता नगर पोलिसांनी छापा टाकला, त्यानंतर 22 बार गर्ल्स, 22 ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या धाडीनंतर हा बार चांगलाच चर्चेत आला.