“ईडी कशा धाडी टाकतात, तशाच धाडी प्रदूषण नियंत्रण मंडळानेही एसटीपी (STP) प्लांटवर टाकाव्यात. प्रक्रिया न करता थेट नदीत पाणी सोडलं जातं का, हे प्रत्यक्ष पाहा,” असा थेट आदेश राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
.
नाशिक जिल्ह्यात उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणाची कारणे आणि पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना यावर चर्चा झाली.
एका देशाने कचरा केला तर इतर देशांनी करायला पाहिजे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी यावेळी बैठकीत बोलताना उपस्थित केला. सध्या संपूर्ण जगासमोर पर्यावरणाचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे उद्योग सुरु करताना पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे आहे. उद्योगाला जपून पर्यावरण रक्षण करायचे. रेड झोनसारख्या वेगवेगळ्या झोनमध्ये प्रदूषण कमी करणे हे महत्वाचे काम आहे, असेही त्यांनी म्हटले.
प्रदूषण झाल्यानंतर आमचे काम सुरू होते
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, आपण जेवढे पाणी वापरतो, त्यापैकी 48 टक्के पाणी ट्रीट करतो. 52 टक्के पाणी वाया जाते. पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर नमामी गंगासारखे उपक्रम सुरू केले. तुम्ही उद्योग सुरू करतात, त्यामुळे तुम्हाला सर्व सुविधा पाहिजे ही अपेक्षा असते. उद्योग विभाग आणि पर्यावरण विभाग यांची जबाबदारी आहे. आधी जबाबदारी उद्योग विभागाची आहे, प्रदूषण झाल्यानंतर आमचे काम सुरू होते. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जे प्रकल्प उभे करायचे, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. काही उद्योग विभागाकडून करावे लागतील.
माझ्या खात्याकडे बजेट नाही
पंकजा मुंडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याबद्दल आणि त्या खात्याला मिळणाऱ्या निधीबाबत आपल्या भावाना व्यक्त केल्या. आम्ही सिईटीपी प्लांट उभारू, पण शासनाने आम्हाला थोडी मदत करावी. माझे काम पोलिसासारखे शिट्टी वाजवण्याचे आहे. माझ्या खात्याकडे बजेट नाही. माझ्या खात्याला बजेट म्हणजे उद्योग विभागाच्या चुका. त्यांना फाईन दिल्यावर आम्हाला बजेट मिळते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
ईडीसारख्याच धाडी टाका
पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही. सीएसआर फंडातून जसे मंदिर, शिक्षणासाठी पैसे उभे करतात, तसे तुम्ही पर्यावरणासाठी निधी उभा करावा. ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाका, प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघा, अशा सूचना पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कुंभमेळ्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत
या बैठकीदरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या उपाययोजनांवरही त्यांनी भर दिला. मागे मी मंत्री झाले, तेव्हा कुंभमेळा भरला होता. आता पुन्हा मी मंत्री झाले आणि पुन्हा कुंभमेळा भरतो आहेत. साधू-महंत जिथे डुबकी मरतील ते पाणी स्वच्छ असले पाहिजे. खूप लोक इथे कुंभमेळा काळात येतील. त्यामुळे स्वच्छतेसाठी शाश्वत उपाययोजना केल्या पाहिजेत. या कुंभमेळ्याला खूप लोक येतील, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले.