Raj Thackeray On Dance Bar Issue: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यामध्ये केलेल्या जाहीर भाषणामध्ये राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असताना इथे सर्वाधिक डान्सबार कसे असा थेट सवाल उपस्थित केला. रायगडमध्ये अनधिकृत डान्सबार एवढ्या मोठ्या संख्येनं कसे काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
डान्सबारबद्दल राज काय म्हणाले?
राज ठाकरेंनी स्थानिकांना जमिनी न विकण्याचं आवाहन केलं. यावेळेस बोलताना राज यांनी, “तुम्हाला जमिनी विकायला लावायच्या. तुमच्या हातात काहीतरी थोडंफार येणार. मग ते काढायलाही काहीतरी येणार,” असं म्हणत डान्सबारच्या विषयाला हात घातला. “सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये? बंद झाले होते ना हो? अनधिकृतरित्या रायगड जिल्ह्यामध्ये एवढे डान्सबार, ते ही कोणाचे तर अमराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या नादी लागून तिकडून पिळून घ्यायचं,” असं म्हणत राज यांनी अप्रत्यक्षपणे डान्सबारपासून दूर राहण्याचं आवाहन केलं.
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा उल्लेख
“अहो हा रायगड जिल्हा आहे ना ओ? आमच्या शिव छत्रपतींची राजधानी आहे ना ओ येथे? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळाने ओटी भरवून पाठवणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असतानाच त्या रायगडमध्ये डान्सबार सुरु आहेत,” असं म्हणत राज यांनी नाराजी व्यक्त केली.
गुजराती, मराठी वाद लावण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप
डान्सबारसारख्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या विषयांकडे भरकटवण्यासाठी असल्याचं राज यांनी स्थानिकांना सांगितलं. “तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयांकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. वेगळेच विषय समोर आणायचे. आमच्याकडे कालच कोणीतरी विषय आणला. आता महाराष्ट्र राज्य स्वत: गुजराती साहित्य संम्मेलन भरवतंय. भरवू देत. व्यापारी चोपड्यांमधून पुस्तकांच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर बरं. पण हे काय चालू आहे केवळ गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही. मराठी गुजराती वाद होऊन त्यातून मत काढण्याचे उद्योग आहेत,” असा घणाघात राज यांनी केला.
स्थानिक तरुणांना राज ठाकरेंनी काय आवाहन केलं?
राज यांनी स्थानिक तरुण, तरुणींना आवाहन करताना, “रायगडमध्ये काय चालू आहे यावर लक्ष ठेवा, तुम्ही विकले जाताय, तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय. तुमची भाषा पण निघून जाणार. कालांतराने पश्चातापाचा हात मारावा लागणार बाकी काही पर्याय राहणार नाही तुमच्याकडे. पैसा सगळ्यांना कमवायचाय. पैसा सगळ्यांकडे आला पाहिजे. तुमची कुटुंबं उभी राहिली पाहिजेत. मात्र महाराष्ट्र विकून नाही,” असंही म्हटलं.