कबुतरांची विष्ठा व पिसे यामुळे श्वसनाचा आजार होण्याची भीती असते. त्यामुळे कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दादर येथील कबुतरखाना पाडण्याच्या कामाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.
.
मुंबई उच्च न्यायालयाने दादरच्या कबुतरखान्यात पक्षांना खाद्य टाकण्यास मनाई केली होती. त्यानंतरही या ठिकाणी खाद्य टाकले जात होते. ही बाब पुढे आल्यानंतर हायकोर्टाने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसेच मुंबई महापालिकेला संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार, शनिवारी कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम येथील एका अनोळखी कार चालकाने एल जे रोडवर कबुतरांना खाद्य टाकले होते. या प्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम 223, 270 व 271 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या निर्देशांनुसार कारवाई
हायकोर्टाच्या निर्देशांनुसार, कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यास संबंधितांवर 500 रुपयांचा दंड व गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही या ठिकाणी खाद्य टाकू नये, असे आवाहन मुंबई महापालिका व पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कबुतरखान्यामुळे श्वसनाचे आजार बळावत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा कबुतरखाना बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली जात आहेत. पण दादर येथील स्थानिक व पक्षीप्रेमींनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
हा कबुतरखाना तोडण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री मुंबई महापालिकेचे एक पथक आले होते. पण यावेळी तिथे अचानक मोठा जमाव जमला. त्यांनी हा कबुतरखाना पाडण्यास तीव्र विरोध केला. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला. त्यानंतर या फौजफाट्याच्या सुरक्षेतच कबुतरखान्याच्या आवारातील पत्रे व इतर सामग्री हटवण्यात आली. आता याठिकाणी कबुतरांच्या वास्तव्यासाठी तयार करण्यात आलेला केवळ एक पिंजरा बाकी आहे. त्यामुळे तो कधी हटवला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिकांचा काय आहे विरोध?
स्थानिकांनी मनपाच्या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या मते, आम्हाला या कबुतरांमुळे कोणताही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरे विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे मनसेनेही या कबुतर खान्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुढे काय होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हे ही वाचा…
शेतकरी क्रांती संघटना ठाकरे गटात विलीन:रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला; मुख्यमंत्री हतबल, जनतेला वाली उरला नाही – उद्धव ठाकरे
मुंबई – शेतकरी क्रांती संघटना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीन झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हतबल मुख्यमंत्री असल्याची टीका केली. मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्याचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर