Raj Thackeray Speech: शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन पनवेल मध्ये साजरा करण्यात आला. खांदा कॉलनी येथील गुरुद्वाराशेजारील पोलीस मैदानावर शेकापचा मेळावा पार पडला. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या गुजराती साहित्य संमेलनावर आपली परखड भूमिका मांडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.
‘आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करु’
तुमचं मूळ विषयांकडे लक्ष गेलं नाही पाहिजे, असं करत आहेत. आता महाराष्ट्र राज्य स्वत: गुजराती साहित्य संमेलन भरवतंय असं ऐकलं. भरवूदेत. व्यापाऱ्यांच्या चोपड्यांतून पुस्तकांच्या चोपड्यांकडे लक्ष गेलं तर बरं. हे गुजराती माणसाविषयीचं प्रेम नाही. मराठी आणि गुजराती माणसाचं भांडण कसं लागेल यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना वाटलं राज ठाकरे, संजय राऊत व्यक्त होतील. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करु. तुम्हाला हवं ते आम्ही करणार नाही. तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय, त्यावेळी अंगावरतीच येऊ, असे राज ठाकरे म्हणाले.
‘विकत घेता येणारी माणसं अशी महाराष्ट्राची प्रतिमा’
कान बंद ठेवू नका. डोळे बंद ठेवू नका. आजुबाजूला काय सुरु आहे,याकडे लक्ष ठेवा. तुम्ही विकले जात आहात. तुमच्या पायाखालची जमिन निघून जातेय. भाषा निघून जातेय. कालांतराने पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही. पैसे कमवायला हवेत पण महाराष्ट्र विकून नाही. ही विकत घेता येणारी माणसं अशी महाराष्ट्राची प्रतिमा आहे, हे अत्यंत दुर्देवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
‘लाल ध्वजाच्या व्यासपीठावर 2 भगवे ध्वज एकत्र आले’
माझी तब्येत ठीक नव्हती पण मी जयंतरावांच्या प्रेमाखातर आज मी इथे आलो. पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये सभा घेईन. पुर्वीचे आजार ताठ मानाने पुढे यायचे. आजार आणि महाराष्ट्राचे राजकारण फारसे काही वेगळे नाही. कोणीही कुठल्या पक्षातून फिरतोय. स्वातंत्र्य मिळायच्या 12 ते 13 दिवस अगोदर शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. इतक्या वर्षानंतरही हे सर्व टिकून आहे हे सर्व आश्चर्य आहे. 1981 साली शिवसेनेचे पहिले अधिवेशन मुंबईत झाले. त्याला प्रमुख पाहुणे श्रीपाद डांगे आले होते. त्यावेळी राजकारण आणि राजकारणी उदार मनाचे होते. ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागलंय. डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपिठावर लाल ध्वज येण्यासारख आहे. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर 2 भगवे ध्वज एकत्र आले आहेत. मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा येतोय. 5 वर्षापुर्वी मी जयंत यांच्या प्रचाराला आलो होतो.
‘रायगडचा मुद्दा समजून घ्या’
आज रायगडचा मुद्दा तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवा. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री राज्यात लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करत. पण महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचा विचारच नाही. याचा भीषण स्वरुप म्हणजे रायगड जिल्हा आहे. रायगडच्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंदे येतायत. एका बाजुला शेतकरी बरबाद होतोय. दुसऱ्या बाजुला बाहेरुन उद्योगधंदे येतायत. रायगडमधील तरुण तरुणी येथे कामाला राहिले पाहिजेत,यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,असे राज ठाकरे म्हणाले. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो मी हिंदी नव्हे गुजराती भाषिक आहे. यांचं काय राजकारण चाललंय ते समजून घ्यायला हवं, असे राज ठाकरे म्हणाले.
मंचावर कोणते नेते उपस्थित?
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी शहरी भागासह गावागावात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. हा मेळावा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा, उमेद निर्माण करणारा ठरेल असे सांगतानाच यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक,प्रा.व्ही.एस. जाधव, कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोर्डे, अतुल म्हात्रे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडीप्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा सरचिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, शंकरराव म्हस्कर यांच्यासह वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.