राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे, बीडसह दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिस वर्दी ची भिती उरलेली नाही, लोकांना न्याय मिळत नाही. कोण आहे यामागे? याच
.
दौंडमधील यवत गावात काल दोन गटांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुळे बोलत होत्या. सुळे म्हणाल्या की, दौंड एक सुसंस्कृत, शांतताप्रिय तालुका आहे. पण बाहेरून काही लोक येऊन इथे समाजात तेढ निर्माण करत असतील, तर त्यांना रोखा. पालकमंत्री अजितदादांना मी विनम्र विनंती करते. दौंडने तुम्हाला खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे दौंडमध्ये गडबड होणार नाही याची जबाबदारी तुमची आहे, असा इशारा त्यांनी दिला.
राहुल कुल यांच्याशी चर्चा
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, दौंडशी अनेक वर्षांपासून आमचे कौटुंबिक नातं आहे. काल स्थानिक आमदार राहुल कुल यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली. राजकीय मतभेद असले तरी त्यांनी सहकार्याची भावना दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सांगतात पुण्यात दादागिरी वाढली; मग कारवाई कुठं आहे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री स्वतः म्हणतात पुण्यात दादागिरी वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूक येत नाही. मग तुम्ही कारवाई का करत नाही? जबाबदारी कोणाची? असा थेट सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
4900 कोटींचा घोटाळा अन् शेतकरी आत्महत्या…
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 4900 कोटींचा भ्रष्टाचार लाडकी बहिण योजनेत झाला आहे. एवढा मोठा जनादेश मिळाल्यानंतर हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहे आणि इकडे मंत्री वाचाळपण करण्यात व्यस्त आहेत. हे सरकार देशातील सगळ्यात दुर्देवी उदाहरण ठरत आहे.
संविधानावर भर देत सुळेंचा केंद्रालाही टोला
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बिहारमध्ये निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही. नाव कमी-जास्त करण्यात येत आहेत. हे सगळे संसदेच्या माध्यमातून चर्चेत आणावे, हीच सशक्त लोकशाही आहे. भारत हा संविधानाने चालतो, कुणाच्या मनमानीने नाही, असा स्पष्ट इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.