सध्या सण-उत्सवाचे दिवस सुरू असून या कालावधीत देवाला प्रसाद म्हणून अर्पण करण्यासोबतच उपवासासाठी फळांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे सध्या फळांना मागणी वाढली असून, आवक ही मर्यादित आहे. त्यामुळे सफरचंद, डाळींब, पिअरसह इतर फळांच्या किमती २०० रुपये किलोवर पोहोचल्यात. तसेच सर्वसाधारण आकाराची केळी ४० तर काहीशी मोठ्या आकाराची केळी ५० रुपये डझन भावाने मिळत आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांच्या खिशाला चटके बसत असून, प्रसादासाठी फळांचा वापर अनिवार्य असला तरी खरेदीवर मर्यादा आल्या आहेत. फळांच्या किमती वाढल्यामुळे एक किलो फळे खरेदी करण्याऐवजी अर्धा किलो खरेदी करावी लागत आहेत. कारण दोन प्रकारची फळे खरेदी केली तरी सहज किमान २०० रुपये लागतात, अशी प्रतिक्रिया गृहिणी छाया धजेकर यांनी दिली. मोसंबी हे स्थानिक पीक असले तरी हा मोसंबी पिकण्याचा मोसम नाही. त्यामुळे तीही बाहेरूनच येते. त्यामुळे मोसंबीचे दर इतर फळांच्या तुलनेत काहीसे कमी असले तरी १२० ते १५० रुपये किलो दराने मिळत आहे. एकूणच काय तर आरोग्यदायी फळे खाणेही आता सोपे राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहेत. एरव्ही सर्वच प्रकारची फळे कमी-जास्त प्रमाणात मिळतात. ड्रॅगन फ्रूटच विक्रेते शहरात सर्वत्र आढळत आहेत. एक ड्रॅगन फ्रूट ७० ते ८० रु. दराने मिळते. यासोबतच किवीही एका पॅकमध्ये तीनच येतात. परंतु, त्यांचाही दर १७५ रुपये आहे. पावसाळ्यात डाळिंबही राज्याच्या काही भागासह बहुतेक परराज्यातूनच येतात. त्यामुळे डाळिंबही २०० ते २२० रुपये दराने तसेच सफरचंदही चव, आकार, गुणवत्तेनुसार २०० ते ३५० रु. किलो भावाने चिल्लर बाजारात विकले जात आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्याच्याच कालावधीत नासपती (पिअर) २२० रुपये किलो दराने मिळत आहे. सध्या पिवळट गुलाबी, फिक्या हिरव्या रंगाचे, गडद लाल रंगाचे असे विविध प्रकारचे सफरचंद बाजारात उपलब्ध असले तरी त्यांची किंमत बघता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. केळीचे उत्पादन जिल्ह्याच्या काही भागात होत असले तरी ते टिकवणे, पिकवणे ही काही साधी बाब नसल्याने त्यांचेही दर ३० रु. डझनावरून ४० ते ५० रु. डझनावर गेले आहेत. …यामुळे दर जास्त ^मागणी जास्त, आवक कमी असल्यामुळे सध्या फळांचे भाव तेजीत आहेत. सफरचंद, डाळिंब, आलूबुखार, पिअर ही फळे परराज्यातून आपल्याकडे येतात. त्यामुळे त्यांचा वाहतुकीचाही खर्च वाढतो. ते टिकवण्यासाठी उपाय करावे लागतात. त्यामुळे या फळांचे दर २०० रुपये किलोवर आहेत. कामिल अहमद, फळांचे ठोक विक्रेते
Source link