Dattatray Bharane First Comment As Agricultural Minister: विधानसभेचं कामकाज सुरु असताना मोबाईलवर पत्ते खेळण्यापासून ते शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने अडचणीत आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची या महत्त्वाच्या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडील जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आली असून कोकाटेंची क्रीडा मंत्रीपदावर बोळवण करण्यात आली आहे. कृषीमंत्रीपदासारखी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर भरणेंनी आपली पहिली प्रतिक्रिया अधिकृत एक्स हॅण्डलवरुन नोंदवली आहे.
कोणाचे मानले आभार?
भरणे यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाठी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. “एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असं भरणेंनी त्यांच्या पोस्टच्या पहिल्या ओळीत म्हटलं आहे. पुढे बोलताना भरणेंनी, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते अजित पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो,” असं म्हणत तिन्ही प्रमुख नेत्यांचे आभार मानलेत.
आपलं शेतकरी कुटुंबाशी असलेलं कनेक्शन सांगताना काय म्हणाले भरणे?
भरणेंनी पुढे बोलताना ते स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याचा उल्लेख आवर्जून केला आहे. “शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे,” असं भरणे म्हणालेत.
राज्यातील शेतकऱ्यांना काय शब्द दिला?
“शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असा शब्द नव्या कृषीमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली,…
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) August 1, 2025