कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!



विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखातं काढून घेतले जाणार आहे. त्यानंतर कृषी खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल? अशा चर्चांना सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावरून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा कृषीखातं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार व ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखातं काढून घेण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याची माहिती पुढे येत आहे. लवकरच या निर्णयावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या आशा पुन्हा एकदा उजळल्या आहेत.

धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर अजित पवार म्हणाले होते की, एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळाली. आणखी एका प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. त्याही प्रकरणात क्लीनचीट मिळाली तर, आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यावर विचार करू, असे म्हटले होते.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बुधवारी (३० जुलै) देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, आज पुन्हा धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्यात भेट झाली. या बैठकीला अजित पवारही उपस्थित असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Web Title: Former Maharashtra minister Dhananjay Munde meets party chief Ajit Pawar and Devendra Fadnavis months after resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24