सेनगाव तालुक्यातून होणारी अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तहसीलच्या पथकाने कंबर कसली असून शुक्रवारी ता. 1 पहाटे चार वाजता तीन टिप्परसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे गौणखनीज वाहतूक करणाऱ्या वाळू तस्कराचे
.
सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. विशेषतः मध्यरात्री वाळू उपसा करून पहाटेच्या सुमारास वाहतूक केली जात असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे पहाटेच्या वेळी भरधाव वेगानं वाहने धावत असल्यामुळे मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.
दरम्यान, सेनगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार देवराव कारगुडे, मंडळ अधिकारी के. एन. पोटे, गजानन पारीसकर, गहिनीनाथ दंडीमे, देविदास इंगळे, रवी इंगोले, प्रशांत देशमुख, संजय लोंढे, वमान राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन केले होते.
या पथकाने गुरुवारी ता. 31 देऊळगाव शिवारात मुरुम उत्खनन करणारी जेबीसी पकडून नर्सी नामदेव पोलिस ठाण्याच्या हवाली केली होती. त्यानंतर आज पहाटे या पथकाने तांदूळवाडी शिवारात वाहनांची तपासणी सुरु केली होती. या तपासा मध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन टिप्पर मध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. पथकाने तीनही टिप्पर जप्त करून सेनगाव पोलिसांच्या हवाली केले आहे. यामध्ये सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सेनगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर होणाऱ्या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत.