कृषी खाते काढून माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते देण्याचा सरकारचा निर्णय चर्चेचा विषय ठरत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी ट्विटर च्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असत
.
सरकारने कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे कृषी खाते काढून क्रीडा खाते दिले. यावर रोहित पवार म्हणाले, क्रीडा खाते हे देखील युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून, आपल्या अनुभवाचा योग्य वापर करून कोकाटे साहेबांनी क्रीडा क्षेत्रास न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. तसेच नवे कृषिमंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादाचे ग्रहण दूर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेमके रोहित पवारांचे ट्विट काय?
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय की, कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती.
भूतकाळातील चुका टाळाव्या
रोहित पवारांनी म्हणाले की, सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवकांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा.
आमचे सर्वच खात्यावर लक्ष
रोहित पवारांनी म्हणाले की,कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खाते बदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशील पणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा!
शेतकऱ्यांच्या मुलाला कृषीमंत्रीपदाचा मान- भरणे
शेतकरी कुटुंबात जन्मलेले दत्तात्रय भरणे यांच्याकडे राज्याच्या कृषी मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. या नव्या जबाबदारी बद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
भरणेंचे ट्विट काय?
दत्तात्रय भरणे म्हणाले की, एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषिमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो.शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.