Solapur Crime News: राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये बलात्कार, मारहाण आणि विनयभंगाच्या अधिक घटना समोर आल्या आहेत. अशातच सोलापुरातून देखील एक धक्कादायक घटना समोर आलीय. सोलापूर शहरातील एका नामवंत खाजगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
या शाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार 56 वर्षीय शिक्षकाविरोधात दाखल करण्यात आली आहे. सदरची ही घटना 19 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत शाळेच्या पार्किंग परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, सोलापुरातील एका प्रसिद्ध शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीवर मानसिक दबाव टाकत विविध प्रकारे अपमानास्पद आणि त्रासदायक विधाने केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तू दहावीत आहेस, चांगली सापडली आहेस अशा प्रकारच्या धमक्या देत शिक्षक तिला त्रास देत होता.
एवढ्यावरच न थांबता शिक्षकाने तिला इतर कोणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे या पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडणारा हा प्रकार दीर्घकाळ गुपित ठेवला. मात्र, शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या विद्यार्थिनीला धीर देत आणि योग्य सल्ला देत पोलिसांकडे तक्रार करण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर संबंधित शिक्षकाविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांकडून संताप व्यक्त
बझार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सध्या या प्रकरणी अधिक तपशील तपास केला जात आहे. विद्यार्थिनीच्या जबाबांवरून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अश्लील वर्तन केल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच या घटनेमुळे सोलापुरातील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पालक आणि इतर लोक करत आहेत. पोलीस तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.