विधिमंडळ सभागृहात रमी खेळल्याने कोंडीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरते अभय मिळाले असले तरी त्यांच्याकडील महत्त्वाचे खाते आता काढून घेण्यात आले आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे द
.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्याने ते उपस्थित नव्हते. मात्र भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बैठकीत काेकाटेंचे खातेबदल करण्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले व रात्री उशिरा त्याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले. विधिमंडळात रमी खेळताना काेकाटेंचा व्हिडिआे व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी हाेत हाेती. मात्र शिंदेसेनेचे काही मंत्री, आमदारही आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. काेकाटे यांच्यावर कारवाई झाली तर शिंदेसेनेच्या मंत्र्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. भाजप सुरुवातीला काेकाटेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही हाेता. मात्र राष्ट्रवादीच्या दबावापुढे नमते घेत अखेर काेकाटेंची दुय्यम खात्यावर बाेळवण करण्याचे ठरवून त्यांना अभय देण्यात आले.
भरणे यांची नाराजी दूर करण्यात यश
अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या दत्तात्रय भरणे यांना यंदा क्रीडा हे दुय्यम खाते देण्यात आले हाेते. हे खाते मिळाल्यामुळे भरणे नाराज हाेते. यापूर्वी अनेकदा त्यांनी ही नाराजी बाेलूनही दाखवली हाेती. मात्र आता त्यांना कृषिमंत्रिपद देऊन अजित पवारांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘बारामती याेग्य वेळी याेग्य संधी देते’ अशी प्रतिक्रिया भरणेंनी सकाळी दिली हाेती.
धनंजय मुंडे यांची जाेरदार लॉबिंग कामी आली नाही
माणिकराव कोकाटे यांच्या कृषिमंत्रिपदावर गंडांतर आल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्रिपदासाठी पुन्हा फील्डिंग लावली हाेती. पण त्यात यश आले नाही. मुंडे यांनी गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याकांडामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मुंडे यांचे मंत्रिपद गेेले हाेते. आता हा वाद काहीसा मागे पडल्यामुळे मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीत खलबते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. शिंदे हे दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आहेत. तिथे ते शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेत आहेत. या बैठकीत संसदेत अधिवेशनात काय काय मुद्दे मांडायचे, याबाबत शिंदे आपल्या खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप झाला. दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांच्याजवळ पैसे भरलेली बॅग असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि मंत्री भरत गोगावले यांच्यावर जादूटोण्याचे आरोप करणारी छायाचित्रेही व्हायरल झाली. गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेनेचे मंत्री वेगवेगळ्या प्रकरणांत वादात सापडले आहेत. आगामी काळात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीत वकिलांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोकाटे तब्बल २२ मिनिटे रमी खेळले
माणिकराव कोकाटे अधिवेशनात १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत होते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच याबाबत विधिमंडळाचा अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अधिवेशनात पत्ते खेळत असतील अशा व्यक्तीला अजित पवार यांनी तत्काळ फेरविचार करून राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.