राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ ऑगस्टला अमरावती जिल्ह्यात येणार आहेत. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातर्फे (माफसू) मोर्शी येथे पदवी महाविद्यालय सुरू केले जात आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीचा कार्यारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेवर बसस्थानकामागील अप्पर वर्धा वसाहतीत दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि आमदार उमेश यावलकर हेही उपस्थित असतील.
याच कार्यक्रमात मोर्शी नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या कार्यक्रमांचा शुभारंभही होईल. दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण आणि जिल्हा परिषद शाळांमधील डिजिटल क्लासरुमचा शुभारंभही यावेळी होणार आहे.
पाच एकर जागेवरील अहिल्या वट वनाचे भूमिपूजन आणि खासदार डॉ. बोंडे यांच्या निधीतील विकासकामांचा शुभारंभही या कार्यक्रमात समाविष्ट आहे. सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होतील.
कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री अमरावतीकडे प्रयाण करून तेथील काही स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. आयोजकांनी सर्व संबंधितांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.