दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीत वाढ होते आहे. त्यातही लहान मुलं ही सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहेत. हा प्रश्न विचारण्याचा उद्देश एवढाच आहे की सायबर गुन्हेगारांच्या तावडीत तुमचं मुलं तर सापडलं नाही ना? कारण सध्या सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहेत ती लहान मुलं. प्रत्येक लहान मुलाच्या हाती सतत मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो. आणि हाच विक पॉईंट सायबर गुन्हेगारांनी बरोबर हेरलाय. सायबर गुन्हेगारांचे गेल्या पाच वर्षांत अश्लीलतेपासून ब्लॅकमेल करण्यापर्यंतचे गुन्हे आठ पटीने वाढले आहेत.
2018 ते 2022 या कालावधीत बालकांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये आठपट वाढ झालीय. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लीलता, ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांनी बालकांचं डिजिटल आयुष्य पोखरलं जातंय. गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिलेल्या एनसीआरबीच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली.
मुलांवरील सायबर हल्ल्यात झालेली वाढ बघितली तर धक्का बसेल. यांत 2018 साली अश्लील मजकूर दाखवण्याच्या घटना 44 होत्या. तर हीच आकडेवारी 2022मध्ये 1 हजार 171 वर गेली. सायबर ब्लॅकमेलिंगच्या घटना 4 वरुन 74 वर तर ऑनलाईन धमकीच्या घटना 40 वरुन थेट 158 झाल्यात.
मुलांवरील सायबर हल्ल्यात वाढ कशी?
2018 2022
अश्लील मजकूर दाखवणं 44 1171
सायबर ब्लॅकमेलिंग 4 74
ऑनलाईन धमकावणं 40 158
सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, बालकांना उद्देशून सायबर माध्यमातून अश्लील साहित्य प्रसारित किंवा प्रकाशित करण्याच्या घटनांमध्ये तब्बल 26 पट वाढ झालीये. लहान मुलांना टार्गेट करणारी वाढती सायबर गुन्हेगारी पाहाता आता केंद्र सरकारने एनसीईआरटी सोबत समन्वय साधून शालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा समाविष्ट करण्याची तयारी सुरु केलीय. इतकंच नाही तर जाहीरातीद्वारे जनजागृती मोहीमेतून प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. तरीही पालकांनी सजग राहणं महत्त्वाचं आहे. शेवटी आपल्या मुलांची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे.