FYJC Admission 2025: महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी 31 जुलै 2025 गुरुवारी जाहीर होतेय. या यादीत सुमारे 3 लाख 86 हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असून, यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवसापासून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रवेशाची अंतिम मुदत 2 ऑगस्ट 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
चौथ्या फेरीला विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद?
चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. 7 हजार 51 विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी केली, तर नियमित फेरीत सहभागी असलेल्या 3 लाख 72 हजार 652 विद्यार्थ्यांनी त्यांचा पसंतीक्रम नोंदवला आहे. याशिवाय, कोटा अंतर्गत 13 हजार 829 विद्यार्थ्यांनीही पसंतीक्रम भरले आहेत. एकूण 3 लाख 86 हजारांहून अधिक विद्यार्थी चौथ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित?
2025-26 शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंतच्या तीन फेरींमधून 8 लाख 11 हजार 731 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 14.32 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. चौथ्या फेरीतील सहभाग पाहता, अजूनही हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
कधीपर्यंत वर्ग सुरू होणार?
राज्य सरकारने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना आणि उच्च माध्यमिक शाळांना 11 ऑगस्टपूर्वी शैक्षणिक वर्ग सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे चौथ्या फेरीनंतर तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याचा दबाव महाविद्यालयांवर आहे. शिक्षण संचालकांनी याबाबत परिपत्रक जारी केले असून, त्यात 11 ऑगस्टपासून वर्ग सुरू करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. याची खातरजमा शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना करावी लागणार आहे. तसेच 11 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याचा विभागनिहाय आढावा शिक्षण संचालकांकडून घेतला जाईल.
प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा काय?
अकरावी प्रवेश प्रक्रियेत नियमित फेरीनंतर स्पॉट ॲडमिशनचा टप्पा पार पडेल, असे सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 11 ऑगस्टपासून अकरावी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्याचे आवाहन शैक्षणिक संस्थांना करण्यात आले आहे.
संपूर्ण माहिती कुठे मिळेल?
विद्यार्थ्यांना आणि पालकांना चौथ्या यादीतील प्रवेशाची माहिती आणि प्रक्रिया याबाबत अद्ययावत माहिती संबंधित महाविद्यालयांच्या वेबसाइटवर किंवा प्रवेश पोर्टलवर उपलब्ध असेल. प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी वेळेत आवश्यक कागदपत्रे आणि फी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.