हिंगोली शहरातील जवाहर रोड भागात तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एकास चाकूने भोसकून जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 31 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या पथकाने आरोपीं
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथील विनोद बेंगाळ व प्रविण जाधव यांच्यात मागील काही दिवसांपुर्वी हिंगोलीच्या खटकाळी बायपास येथे वाद झाला होता. त्यातून हाणामारीची घटनाही घडली होती. याप्रकरणी विनोद बेंगाळ यांनी हिंगोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, या घटनेनंतर दोन गटामध्ये धुसफुस सुरुच होती. किरकोळ वाद होऊ लागले होते. विनोद बेंगाळ हे बुधवारी ता. 30 हिंगोली शहरातील जवाहर रोड भागात आले असतांना त्या ठिकाणी प्रविण जाधव याच्यासह सहा जण तेथे आले. त्यांनी विनोद याच्याशी वाद घालून तु दिलेली तक्रार मागे घे या कारणावरून मारहाण सुरु केली. अचानक होत असलेल्या मारहाणीमुळे विनोद घाबरून गेले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रविण याने त्याच्या जवळील चाकूने विनोद याच्या पोटावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र विनोद याने वेळीच वार चुकविल्यामुळे चाकू मांडीत घुसला.
यामध्ये विनोदं गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सर्व जमाव निघून गेला होता. याप्रकरणी विनोद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रविण जाधव, तौफीक शेख, ओम गरड, शेख साहील, ऋषीकेश मगर, जगन काशिद यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून त्यांचा शोध सुरु केला आहे.