श्रीसाईबाबांनी महानिर्वाणाच्या वेळी भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविद्या भक्तीचे प्रतीक म्हणून चांदीची ९ नाणी दिल्याचा इतिहास आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शिंदे व गायकवाड कुटुंबांनी ही नाणी आपल्या ताब्यात असल्याचा दावा केल्याने वाद निर्माण झाला. स
.
दरम्यान, नाण्यांच्या सत्यतेबाबत गायकवाड यांनी विधान करताना साईबाबांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप शिर्डीच्या ग्रामस्थांनी केला. गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी शिर्डीतील मारुती मंदिरासमोर नागरिकांनी निषेध सभा घेतली. गायकवाड यांना शिर्डीत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. निषेध सभेनंतर ग्रामस्थांनी अरुण गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून साईभक्त ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गायकवाड यांच्या दुकानाचा करार रद्द करून दुकान खाली करण्याचा निर्णय संबंधित मालकांनी घेतल्याचे सांगण्यात आले. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी गायकवाड यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेऊ
साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणी दिल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. मात्र, सध्या २२ नाणी समोर येत असल्याने शिंदे व गायकवाड कुटुंबांना संस्थानतर्फे यापूर्वीच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. गायकवाड यांचे वक्तव्य अयोग्य असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. – गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साईबाबा संस्थान, शिर्डी
नाणी संग्रहालयात ठेवण्याची मागणी
ग्रामस्थांनी गायकवाड यांच्या ट्रस्टची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच शिंदे कुटुंबाने आपल्याकडील नाणी संस्थानकडे सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली आहे. गायकवाड यांनीही आपल्याकडील नाणी संस्थानकडे जमा करून त्यांच्या सत्यतेची तपासणी करून खऱ्या नाण्यांना साई संस्थानच्या संग्रहालयात दर्शनासाठी ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.