सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील वृद्ध शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता. ३० सकाळी घडली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी बाजीराव वडकुते (७२) यांना बाभूळगाव शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतावर त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा खंडाळा यांच्याकडून १.९० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र मागील काही वर्षात नापिकी झाल्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते.
दरम्यान, नेहमी प्रमाणे ते आज सकाळी साडे पाच वाजता गावालगतच असलेल्या शेतात फिरण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते परत आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर शेतातील विहिरीत पाहणी केली असता विहिरीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, जमादार मंचक ढाकरे, अनिल भारती, आसोले यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल केला. या ठिकाणी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. मयत बाजीराव यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
या प्रकरणी गंगाधर वडकुते यांनी दिलेल्या माहितीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार मंचक ढाकरे पुढील तपास करीत आहेत.