ED Raid Who Is Anil Kumar Pawar: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त, मुंबई महानगर विभागाच्या ‘एसआरएस’ चे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिलकुमार पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ‘ईडी’ने धडक कारवाई सुरु केली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरु केलं आहे. मात्र अल्पावधीमध्ये ‘पॉवर’ वाढलेले अनिल पवार हे इतके शक्तीशाली कसे झाले? त्यांचं वजन आणि दबदबा कसा वाढत गेला? यावरच नजर टाकूयात…
घरात 1 कोटी 20 लाख रुपयांची कॅश
मुंबई-राज्याच्या महसूल खात्यात ‘वजन’ राखून असलेल्या आणि अलीकडच्या काळात हवे तेव्हा ‘मलाई’दार पदावर बसणारे अनिल पवार आता ‘ईडी’च्या कचाट्यात अडकले आहेत. गंभीर बाब म्हणजे, ईडीच्या छाप्यात प्रचंड घबाड हाती लागल्याची माहिती असून, त्यात पवार यांच्या नाशिकमधील घरात 1 कोटी 20 लाख रुपयांची कॅश सापडली आहे. तर काही कागदपत्रेही अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईतून पवार यांची शेकडो कोटींची मालमत्ता उघड होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. परिणामी, प्रचंड तक्रारीनंतर थेट कारवाईत अडकलेले पवार यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. पवार यांच्यासह या महापालिकेतील काही अधिकारीही ‘ईडी’च्या निशाण्यावर असतील.
बेकायदा बांधकामांना छुपे प्रोत्साहन दिल्याचा ठपका
वसई-विरार महापलिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांना छुपे प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणात पवार यांच्यावर ‘ईडी’ ने कारवाई केली असून, पवार यांची चौकशी करतानाच ईडीने त्यांच्या नाशकातील निवासस्थानासह वसई-विरार, मुंबई येथील पवार यांच्या मालकीच्या जागेत छापे टाकण्यात आले आहेत. वसई-विरार महापालिकेत महत्त्वाच्या पदावर असताना अधिकारी मंडळींनी वाटेल तसा कारभार करून प्रचंड पैसे कमवित असल्याच्या तक्रार आहेत. याआधीही याच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘ईडी’ने घेरले होते. ‘स्वराज्य अभियाना’चे प्रमुख धनंजय गावडे यांनी केलेल्या तक्रारी अनिल पवार यांच्याही नावाचा उल्लेख होता.
नवा पदभार स्वीकारण्याआधीच कारवाई
त्यातच, गेल्या काही महिन्यात आयुक्त म्हणून पवार यांनी घेतलेल्या बहुतांशी निर्णयावर नाराजी होती. त्यामुळे त्यांचे निर्णय हे वादाच्या भोवऱ्यात होते. त्यात, महापालिकेतील सर्वच खात्यातील टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप वाढवून पवार यांनी प्रशासकीय ताकदीचा गैरवापर केल्याचे दिसत होते. ‘ईडी’च्या धाडीनंतर पवार आणि त्यांच्या टीमने महापालिकेत केलेल्या काळेधंदे उघड होऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या आयुक्तपदावरून पवार यांची काही दिवसांआधी बदली झाली. मुंबई विभागाच्या ‘एसआरए’च्या मुख्यकार्यकारी पदावर त्यांची नेमणूक झाली. मात्र, हा पदावर घेण्याआधी पवार यांनी महापालिकेत राहून काही फायल्स फिरवल्या. त्यात संशयास्पद असल्याची चर्चा आहे. आता साऱ्या कारभारावर ईडीची नजर राहणार आहे.
राज्यभरात छापेमारी
सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिकमध्ये अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेत जमीन, फॉर्म हाऊस तसेच प्लॉट असल्याचे समजते सकाळच्या सुमारास सटाणा शहरात इनोव्हा गाड्या व त्यात पोलीस असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला होता. पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार सोडल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित नाशिक पुणे अशा एकूण बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली.
22 तास चौकशी
तब्बल 22 तास अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी माजी आयुक्त अनिल कुमार पवार होते त्या ठिकाणी पवार यांनी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ईडीची कारवाई बुधवारी पहाटे दीड वाजल्यानंतर ईडी अधिकारी या ठिकाणावरून निघून गेले. यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याचे दिसून आले. परंतु अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले नाही.