महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामुळे 1 ते 10 ऑगस्टपर्यंत देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे.
.
मंदिर समितीच्या माहितीनुसार, पुरातत्व खात्याने तुळजाभवानी देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे 1 ते 10 ऑगस्टपर्यंत भाविकांना देवीचे केवळ मुखदर्शन घेता येईल. या कालावधीत देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन पूर्णतः बंद राहील. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होणार असली तरी तुळजाभवानी देवीचे इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामावर आक्षेप घेतला होता. तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मंदिर संवर्धन करताना भिंतींवर करण्यात आलेले ब्लास्टिंग चुकीचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या नाराजीनंतर पुरातत्व विभागाकडून हे काम पुन्हा करण्यात येत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे श्री तुळजाभवानी मंदिर व शहर विकास आराखड्यांतर्गत केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून 1860 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून 58 कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. भाविक भक्तांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
गोमुख झरा 35 वर्षांनंतर सुरू
विशेष म्हणजे मंदिर परिसरातील श्री गोमुख तीर्थकुंडालाही पुरातन रूप देण्यात येत आहे. हे काम सुरू असताना 1988 पासून बंद असलेला नैसर्गिक झरा नव्याने सुरू झाला आहे. हा झरा तब्बल 35 वर्षांपासून बंद होता. पाण्यातील क्षारामुळे या झऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. याठिकाणी 1986 सालची काही नाणीही आढळली होती. हा क्षार, नाणी व आसपासचा थर काढण्यात आल्यानंतर हा झरा पुन्हा जिवंत झाला. यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. बालाघाटच्या डोंगर रांगातील पाणी नैसर्गिकरित्या या झऱ्यातून देवीच्या मंदिरात पोहोचते.
हे ही वाचा…