Pune Police: पुण्यात कारगिल युद्धातील एका योद्ध्याच्या कुटुंबाला अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. मला भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितले गेल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केलाय. 30-40 लोकांचा जमाव पोलिसांसह आमच्या घरी आले आणि आम्हाला धमकावून नागरिकत्वाचे पुरावे मागितल्याची माहिती कुटुंबाने दिली. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कारगिल योद्धाचे नाव काय?
कुटुंबाने त्या भयावह रात्रीचा उल्लेख करत आम्ही घाबरलो होतो, असे सांगितले. हे कुटुंब हकीमुद्दीन शेख यांचे आहे. हकीमुद्दीन हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात भाग घेतला होता. मध्यरात्री त्यांना पोलिस स्टेशनवर नेण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
हकीमुद्दीन यांनी किती वर्षे दिली सेवा?
हकीमुद्दीन यांचे वय सध्या 58 वर्षे आहे. त्यांनी 1984 मध्ये सैन्यात प्रवेश केला आणि 269 इंजिनीअर रेजिमेंटमध्ये 16 वर्षे सेवा दिली. 2000 मध्ये ते निवृत्त झाले. “मी कारगिल युद्धात लढलो, या देशासाठी लढाई केली. माझे संपूर्ण कुटुंब या देशाचे आहे. मग आम्हाला भारतीय असल्याचा पुरावा का मागितला जात आहे?” असा प्रश्न हकीमुद्दीन यांनी विचारला.
हकीमुद्दीन पुण्यात कधीपासून?
हकीमुद्दीन यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील आहे. 1960 मध्ये त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. 2013 मध्ये हकीमुद्दीन पुणे सोडून आपल्या मूळ गावी परतले. मात्र, त्यांचे भाऊ, पुतणे आणि त्यांचे कुटुंब अजूनही पुण्यात राहतात.
हकीमुद्दीन यांच्या भावाने काय केला आरोप?
काही अज्ञात व्यक्ती घोषणा देत आमच्या घरात घुसले. त्यांनी दारावर लाथा मारल्या आणि भारतीयत्वाचे पुरावे मागितले. एक पोलिस व्हॅन रस्त्यावर उभी होती, ज्यामध्ये त्यांना पोलिस स्टेशनवर नेण्यात आल्याची माहिती हकीमुद्दीन यांचे भाऊ इरशाद शेख यांनी दिली.
कुटुंबाने कोणते प्रश्न उपस्थित केले?
या कुटुंबात शेख नईमुद्दीन आणि शेख मोहम्मद सलीम असे आणखी दोन सैन्य निवृत्त सैनिक आहेत. ज्यांनी 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये भाग घेतला होता.सैनिकांच्या कुटुंबियांशी अशी वागणूक दिली जाते का? भारतीय असण्याचा अर्थ काय? कोणीही घरात घुसून आमच्याकडे भारतीयत्वाचे पुरावे मागेल का? असे प्रश्न इरशाद यांनी उपस्थित केले. आमची वैध कागदपत्रे नाकारण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला. तर आधार कार्ड दाखवूनही ते बनावट ठरवून त्यांची थट्टा करण्यात आल्याचे हकीमुद्दीन यांचे पुतणे नौशाद आणि नवाब शेख यांनी सांगितले.घरी आलेले लोक गुंडांसारखे वागत होते, असा आरोप नौशाद यांनी केला.
पोलिसांनी काय दिले स्पष्टीकरण?
आम्हाला पोलिस स्टेशनवर नेऊन पहाटे 3 वाजेपर्यंत बसवून ठेवले. तसेच आम्हाला धमकी देण्यात आली. जर तुम्ही नागरिकत्व सिद्ध केले नाही तर तुम्हाला बांगलादेशी किंवा रोहिंग्या घोषित केले जाईल, असे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. पोलिसांना अवैध स्थलांतरितांबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे तपासासाठी पथक पाठवले गेले. कुटुंबाकडून कागदपत्रे मागितली गेली आणि ते भारतीय असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती डीसीपी सोमय मुंडे यांनी दिली. पोलिसांसोबत कोणी तिसरा व्यक्ती होता, असे म्हणत डीसीपी सोमन यांनी कुटुंबाच्या आरोपांचे खंडन केले. आमच्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत, ज्यामध्ये पोलिसांसोबत कोणीही बाहेरचा व्यक्ती नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.