Dada Bhuse Vs Sanjay Raut On ED Raid: वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशीसंबंधित मालमत्तांवर छापेमारी सुरु असतानाच आता त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंशी कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केल्यानंतर आता दादा भुसेंनी यासंदर्भात आपलं मत मांडलं असून थेट संजय राऊत यांना आव्हान दिलं आहे. नेमकं राऊत काय म्हणाले? हे अनिलकुमार पवार प्रकरण काय आहे? राऊतांच्या दावावर भुसेंनी काय आव्हान दिलंय पाहूयात…
अनिलकुमार पवार प्रकरण काय?
सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिकमध्ये अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेत जमीन, फॉर्म हाऊस तसेच प्लॉट असल्याचे समजते सकाळच्या सुमारास सटाणा शहरात इनोव्हा गाड्या व त्यात पोलीस असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला होता. पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार सोडल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित नाशिक पुणे अशा एकूण बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली.
तब्बल 22 तास अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी माजी आयुक्त अनिल कुमार पवार होते त्या ठिकाणी पवार यांनी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ईडीची कारवाई बुधवारी पहाटे दीड वाजल्यानंतर ईडी अधिकारी या ठिकाणावरून निघून गेले. यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याचे दिसून आले. परंतु अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले नाही.
राऊतांनी काय आरोप केलाय?
अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे पडत असतानाच आता अनिलकुमार पवार यांचं मंत्री दादा भुसेंशी कनेक्शन असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अनिलकुमार पवार हे दादा भुसेंचे भाचे जावई असल्याची माहिती समोर येत आहे. अनिलकुमार पवार यांच्या संपत्त्यांवरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना राऊत यांनी, “अनिल पवार यांना नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसे यांनी अनिल पवारसाठी आग्रह केला होता. या कारवाईचे धागेदोरे मंत्र्यापर्यंत जातात. दादा भुसे यांचे शिफारसपत्र सुद्धा आहे,” असा दावा केला आहे.
भुसेंनी राऊतांना काय चॅलेंज दिलं?
“ईडी ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. न्याव्यवस्था योग्य कारवाई करेलच,” असं भुसेंनी म्हटलं असून, “अनिलकुमार पवार माझे दूरचे नातेवाईक हे मी नाकारत नाही,” असंही ‘झी 24 तास’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. “मी एकनाथ शिंदेंकडे शिफारस करुन त्यांची पोस्टींग करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र मी माहिती घेतली की, अनिलकुमार पवार यांची पोस्टींग एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेंच्या काळात झाली आहे,” असंही भुसे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “मी जो दावा दाखल केलाय तो अश्या आरोपांमुळे मी मागे घेईल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकत आहेत. मी जर (अनिलकुमार पवार यांची) शिफारस केली असेल तर ते सिद्ध करावं. नातेवाईक आहेत हे मी मान्यच करतो,” असंही भुसे म्हणालेत.
पुढे बोलातना भुसेंनी थेट संजय राऊतांचं नाव घेत त्यांना आव्हान दिलंय. “संजय राऊतांनीही शिफारस केली असू शकते. संजय राऊतांना माझं आव्हान की त्यांनी हा आरोप सिद्ध करावा. सनसनाटी निर्माण केली जातेय,” असा दावा भुसेंनी केला. “मी काल दिल्लीत होतो, कॅबिनेटला उपस्थित नसल्याचं पत्र दिलं. त्यामुळे मी स्नेहभोजनाला नव्हतो,” असंही भुसेंनी मंगळवारच्या अनुपस्थितीबद्दल म्हटलं.