विधवा महिलेस गुजरातमध्ये विकलं, सव्वा लाखात सौदा, 2 वर्षे शोषण, मुलाला जन्म आणि…;अंगावर काटा आणणारी घटना!


Crime News: एका विधवा महिलेचा सासरच्या लोकांनी 1 लाख 20 हजार रुपयांना सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या विधवा महिलेस  गुजरातमधील एका व्यक्तीला विकले होते. या व्यक्तीने तिच्याशी लग्नाच्या नावाखाली 2 वर्षे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. तिच्यापासून मुलगा झाल्यानंतर तिला तिच्या गावी आणून सोडून देण्यात आले. सध्या ही पीडित महिला आर्णी पोलिस स्टेशनमध्ये आपली व्यथा मांडत आहे आणि तिच्या बेपत्ता मुलगा आणि मुलीचा शोध घेण्याची विनंती करत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातून हा प्रकार समोर आलाय.

लग्न केल्याचे भासवून तिचे सतत शोषण

पीडित महिला आपल्या पती आणि एका मुलाच्या अकस्मात निधनानंतर आपल्या एका मुलगा आणि मुलीचा सांभाळ करत होती. या कठीण परिस्थितीत तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या कमकुवत अवस्थेचा गैरफायदा घेतला. तिची नणंद आणि नंदोई यांनी तिला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मध्य प्रदेशात नेले. तिथे त्यांनी गुजरातमधील पोपट चौसाणी नावाच्या व्यक्तीला तिला 1 लाख 20 हजार रुपयांना विकले. या व्यक्तीने तिच्याशी लग्न केल्याचे भासवून तिचे सतत शोषण केले. दोन वर्षांनंतर, तिच्यापासून मुलगा झाल्यावर तिला तिच्या गावी परत आणून सोडून देण्यात आले.

क्रूर कृत्याचा खुलासा

2023 मध्ये या महिलेच्या आई-वडिलांनी ती आणि तिची दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार आर्णी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, ही महिला त्यांना गावातच आढळली. तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी केलेल्या क्रूर कृत्याचा खुलासा झाला. पोलिसांनी तिच्या सासू, सासूच्या दुसऱ्या पती, दीर, नणंद आणि नंदोई यांच्याविरुद्ध मानवी तस्करी आणि शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

बेपत्ता मुलांचा शोध

या महिलेचा एक मुलगा आणि मुलगी सध्या बेपत्ता आहेत, आणि त्यांचा ठावठिकाणा तिला माहीत नाही. आपल्या दोन्ही मुलांना पुन्हा भेटण्यासाठी ती आतुर आहे आणि पोलिसांना त्यांचा शोध घेण्याची विनंती करत आहे. सासरच्या लोकांनी या मुलांचे काय केले, याबाबतचा तपशील तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अनेकदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विधवा महिलांना अशा गुन्ह्यांचे बळी बनवले जाते. यवतमाळ जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून, यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. मानवी तस्करीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 370 आणि संबंधित कायद्यांतर्गत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय. तसेच विधवा आणि निराधार महिलांना आर्थिक आणि सामाजिक संरक्षण देण्यासाठी सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त होतेय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24