ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : ‘हनी ट्रॅप’सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईत दोन ठिकाणी गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाचे आणखी प्रताप समोर आलेत. लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा पुण्याच्या बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. एकाच महिन्यात एकापाठोपाठ प्रफुल्लवर गुन्हे दाखल कसे झाले असा सवाल विरोधकांनी केला आहे.
एक बटण दाबेन आणि देशात खळबळ माजेल अशी धमकी देणारा प्रफुल्ल लोढा हा हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रफुल्ल लोढावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागलीये.
गुन्ह्यांची संपूर्ण माहिती
3 जुलै 2025 – साकीनाका पोलीस ठाण्यात 16 वर्षांच्या मुलगी आणि तिच्या मैत्रिणीवर अत्याचाराचा गुन्हा
14 जुलै 2025 – अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हनिट्रॅपच्या कलमांतर्गत गुन्हा
17 जुलै 2025 – पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्काराचा गुन्हा
लोढावर एकामागून एक दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत विरोधकांना संशय आहे. लोढावर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल होण्यासाठी जुलै महिनाच सापडला का असा सवाल एकनाथ खडसेंनी केला आहे. प्रफुल्ल लोढाबाबत गिरीश महाजनांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलंय. प्रफुल्ल लोढासारखे अनेकजण आपल्यासोबत फोटो काढतात…. प्रत्येक फोटो काढणारा आपला कार्यकर्ता कसा म्हणता येईल असा सवाल गिरीश महाजनांनी केलाय. एवढंच नव्हे तर प्रफुल्ल लोढा वंचितचा उमेदवार असल्याचा नवा दावा त्यांनी केलाय.
प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा असून मोठा मासा मंत्रिमंडळात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. प्रफुल्ल लोढाविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होणे…. विरोधकांनी सातत्यानं हनी ट्रॅपचे आरोप करणे हे वरवर दिसतंय तसं काही नाही… प्रफुल्ल लोढाकडं अनेक गुपित आहेत का?…. प्रफुल्ल लोढाकडं काही पुरावे आहेत का?…अशी चर्चा या निमित्तानं संपूर्ण राज्यभर सुरु झाली आहे.