कल्याण हल्ला प्रकरण: पीडितेच्या न्यायासाठी मनसे आक्रमक: अविनाश जाधव यांनी दिला आंदोलनाचा इशारा, म्हणाले- त्याला आम्ही धडा शिकवणार – Mumbai News



रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीवर झालेल्या मारहाणीप्रकरणी आरोपी गोकुळ झा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून फेरीवाल्यांकडून हफ्ते गोळा करणे हेच त्याचे मुख्य काम असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी दिली आहे.

.

या घटनेनंतर पीडित तरुणीवर उपचार सुरू असून तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मनसेने उचलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेला 22 तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. तो अद्याप फरार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने पोलिसांना इशारा दिला आहे. पुढील काही तासांत जर आरोपी अटक झाला नाही, तर आम्ही पोलिस ठाण्यासमोर आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.

कल्याण पूर्वमधील एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीवर गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली, तसेच पीडित तरुणीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. त्यांनी तिच्या उपचाराच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेण्याचे आश्वासनही दिले.

या प्रकरणाबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले, त्या मुलीची अवस्था पाहून संताप अनावर होतो. छाती, पाठ आणि पायांवर जबर मारहाण करण्यात आली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यंत आवश्यक होते. कालपासून ती तशीच आहे. इतकेच काय, तिचे कपडेही अद्याप बदललेले नाहीत.

पोलिसांच्या कारवाईबाबतही मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेला 22 तास उलटून गेले, तरीही आरोपी गोकुळ झा फरार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही रात्रीच्या वेळी उचलता, मग अशा गुन्हेगाराला अटक का होत नाही?, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले की, हा प्रकार मराठी-अमराठी वादाचा मुद्दा नसला तरी, जर बाहेरून आलेला एखादा व्यक्ती आमच्या मराठी मुलीला अशा प्रकारे मारत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. त्यांनी पुढे म्हटले, जर लवकरात लवकर आरोपीला अटक झाली नाही, तर आम्ही पोलिस ठाण्यासमोर आंदोलन छेडू, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, काही राजकीय नेत्यांवरही जाधव यांनी टीका केली. मतांसाठी काही नेते बाहेरून माणसे आणतात आणि त्यांना वाटते, त्यांनी काहीही केले तरी ते माफ होईल. पण मनसे अशा प्रकारांना कधीही सोडून देणार नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला.

शालिनी ठाकरेंचा सरकारवर निशाणा

कल्याणमधील तरुणीवर झालेल्या मारहाणीला 24 तास उलटले तरी आरोपी अजूनही फरार असल्यामुळे राज्य सरकारच्या यंत्रणांवर टीका सुरू झाली आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. कल्याणमधल्या मुलीला मारहाण होऊन 24 तास झालेत. राज्याचे गृहखाते इतके कमजोर आहे का, की एका तिरपट गुंडाला 24 तासांत शोधू शकत नाही? महाराष्ट्रातल्या आया-बहिणींवर हात उचलले जात असतील आणि गुन्हेगार मोकाट फिरणार असेल, तर राज्याची सुरक्षा रामभरोसे आहे, असेच म्हणावे लागेल, असे ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. तसेच, कल्याणच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा. त्या नराधमाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24