भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या उंचीच्या लाटांचा इशारा दिला आहे. यानुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर भागातील समुद्रकिनाऱ्यावर 23 जुलै सायंकाळी 5.30 वाजल्यापासून 24 जुलै रात्र
.
या पार्श्वभूमीवर लहान होड्यांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या असून, मत्स्य व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.
रायगड, कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट भागात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनांना पूर्ण सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना तात्काळ सज्ज राहण्यास सांगितले आहे.
अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरस्थिती, नागरिकांची सुखरूप सुटका
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात 117.8 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे मौजे हदगाव नखाते गावात 7 ते 8 नागरिक पूराच्या पाण्यात अडकून घराच्या छतावर आश्रय घेत होते. या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाने वेळेवर सुखरूपपणे बाहेर काढले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तसेच, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे बरडा येथे तीन नागरिक मंदिरात अडकले होते. स्थानिक बचाव पथकाने तत्काळ कारवाई करत त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवले असून सध्या येथे परिस्थिती सामान्य आहे.
राज्यभरात पावसाचे प्रमाण काही भागांमध्ये वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्टवर आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.