पूजेच्या नावाखाली सायबर फसवणूक: वानवडीतील व्यक्तीकडून 5 लाख 30 हजार रुपये उकळले; पोलिसांत गुन्हा दाखल – Pune News



ऑनलाइन पूजेच्या आमिषाने एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.

याबाबत एकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे घोरपडी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १७ जून रोजी संपर्क साधला. एका देवस्थानात देवीची पूजा करण्यात येणार आहे. भक्तांना या पूजेत सहभागी होता येणार असून, त्यासाठी काही रक्कम जमा करावी लागेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी तक्रारदाराकडून पाच लाख ३० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची पाच लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे आंबेगावमधील जांभुळवाडीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पाच लाख ५६ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच मुद्दलही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24