राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, नेहमी वैचारिक मतभेद असलेले आणि परस्परांवर टीका करणारे ज्येष्
.
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकात शरद पवारांनी फडणवीस यांच्याविषयी विशेष लेख लिहिला असून, त्यात त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे, नेतृत्वगुणांचे आणि धैर्याचे मन:पूर्वक कौतुक केले आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणतात, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे! अन् बोलायचंच म्हटले तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, हे कसे काय नाकारता येईल? देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला ‘मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो’ तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो.
फडणवीस थकत कसे नाहीत? असा प्रश्न मला पडतो
शरद पवार यांनी म्हटले की, क्रियाशील राहण्याकरीता प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ‘ते थकत कसे नाहीत?’ असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे, उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती
देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी केलेल्या कामांचा ऊहापोह कॉफी टेबलबुकमध्ये होईलच. परंतु, मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, असेही पवार यांनी म्हटले आहे.
राजकीय आखाड्याबाहेरील क्षितीजे पार करावीत
कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा. जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगितले आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य प्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्याबाहेरील क्षितीजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा वाढदिवासानिमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद, असे शरद पवार यांनी या लेखात म्हटले आहे.