‘…तर मी राजीनामा सादर करणार’, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं जाहीर


Manikrao Kokate on Playing Rummy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. सभागृहात चर्चा सुरु असताना कृषिमंत्री मोबाईलमध्ये गेम खेळणं अनेकांना रुचलं नसून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हे आमच्यासाठी फार भूषावह नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी आपण दोषी आढळल्यास राजीनामा देऊ असं जाहीर केलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं. 

रमी खेळण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “हा इतका छोटा विषय असताना इतका का लांबला मला माहिती नाही. मी यावर याआधीही खुलासा केला आहे. ऑनलाइन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर कनेक्ट करावा लागतो, तसंच बँकेचं अकाऊंटही संलग्न करावं लागतं. त्याशिवाय ऑनलाइन रमी खेळता येत नाही. अशा प्रकारचं कोणतंही अकाऊंट किंवा मोबाईल नंबर कनेक्ट नाही. ज्या दिवसापासून ऑनलाइन रमी सुरु झालं आहे, त्या दिवसापासून एक एक रुपयाचीगी रमी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रात माझी बदनामी झाली आहे”. कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, बदनामी केली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

“हाऊसमध्ये माझं काम होतं, लक्षवेधी होती. माझ्या ओएसडी किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्यावर मोबाईल गेम पॉप अप झाला. एक एका सेकंदाला गेम येत असतात. मोबाईल नवा असल्याने मला तो स्कीप करता आला नाही. पण स्कीप केल्यानंतरचा व्हिडीओ समोर आलाच नाही. आपण 5 जीमध्ये असल्याने मोबाईलवर एकामागोमाग गेम पॉप अप होतात आणि ते स्कीप करावे लागतात. हा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यात मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. माझा खेळण्याचा काही हेतू नव्हता. पूर्ण दाखवलं असतं तर काहीही तथ्य नसल्याचं लक्षात आलं असतं,” असंही त्यांनी सांगितलं. 

“मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, विधानसभा अध्यक्ष या सर्वांना लेखी पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पत्राच्या आधारे चौकशी करावी. जर मी ऑनलाइन रमी खेळत असेन आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यातील कोणीही निवेदन करावं. त्या क्षणी न थांबता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे मी माझा राजीनामा सादर करेन,” असंही त्यांनी जाहीर करुन टाकलं. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24