NCP vs छावा संघटना प्रकरणात अजित पवारांची उडी! सूरज चव्हाणला दणका देत म्हणाले, ‘काल लातूरमध्ये…’


Chhava Sanghatana Vs NCP Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमध्ये घडलेल्या हाणामारी प्रकरणामध्ये अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या निर्णयाची माहिती दिली असून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना हाणामारी करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी काय म्हटलंय?

“काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे,” अशी पोस्ट अजित पवारांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन करण्यात आली आहे.

शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या

त्यापूर्वीच्या एक्स पोस्टमध्ये अजित पवारांनी, “काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या,” असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं.

अजित पवारांच्या पक्षाचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरामधून त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर जालन्यात छावा संघटना आक्रमक झाली असून थेट अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयावर काल रात्री बारा वाजेच्या सुमारास छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून आग लावण्याचा प्रयत्न केला.

गुन्हा दाखल

चव्हाण यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आङे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक अशी दोन पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी मार्गस्थ झाली आहेत. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका छावा संघटनेनं घेतली आहे. 

 

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24