हिंगोलीसह लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात पोलिस उपमहानिरीक्षकांच्या आदेशावरून शनिवारी ता. 19 एकाच दिवशी 167 ठिकाणी छापे टाकून 3000 लिटर गावठी दारु, 2000 लिटर दारु गाळपासाठी लागणारे रसायन, 2 हजार बाटल्या देशी दारूसह 5.68 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
.
नांदेड परिक्षेत्रात येणाऱ्या हिंगोली, लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायाची उच्चाटन करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेवरून अवैध व्यवसाय विरोधी अभियान 02 राबवले जात आहेत. या अभियानात बेकायदेशीर दारु विक्री, जुगार, मटका अड्डे, गुटखा विक्री या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली जात आहे.
दरम्यान, शनिवारी ता. 19 चार जिल्ह्यात नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, परभणीचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व लातूरचे प्रभारी पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली 147 अधिकारी व 663 पोलिस कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी छापे टाकले. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात एकूण 167 ठिकाणी छापे टाकले आहेत.
यामध्ये हिंगोली जिल्ह्यात 42 ठिकाणी छापे टाकून 54 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यात 35 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 44 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात 61 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3.14 लाख रुपये तर लातूर जिल्ह्यात 29 ठिकाणी छापे टाकून 1.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 167 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहिम यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. नागरिकांनीही अवैध व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.