अंधश्रद्धा निर्मुलन समितीने वैजापूरच्या शिरूर येथील एका भोंदूबाबाचा पर्दाफाश केला आहे. हा भोंदूबाबा दारू सोडवण्यासाठी येणाऱ्या लोकांना बूट तोंडात धरण्यासाठी देत होता. एवढेच नाही तर या प्रकरणी महिलांना चुकीचा स्पर्शही करत होता, असा आरोप आहे. या प्रकरण
.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजय रंगनाथ पगार (50) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. तो शिरूरच्या बिरोबा मंदिरात आपला दरबार भरवत होता. तो लोकांची दारू सोडवण्याचा दावा करत होता. यासाठी आपल्याकडे येणाऱ्या लोकांना तो आपले मूत्र द्यायचा. तसेच भूत उतरवण्याच्या नावाखाली तोंडात बूट धरण्यासही द्यायचा. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी किशोर शांताराम आगळे यांनी सरकारतर्फे ही तक्रार दाखल केली.
काय आहे व्हिडिओत?
या तक्रारीनुसार, सदर भोंदूबाबा वेगवेगळ्या समस्यांनी वेढलेल्या नागरिकांना शोधून त्यांच्यावर अघोरी प्रकार करत होता. गुरूवारी दुपारी 1 च्या सुमारास या बाबाने एका तरुणावर अघोरी कृत्य केले. यासंबंधीच्या एका व्हिडिओत दिसत आहे की, भोंदूबाबा मंदिरात बसून एका तरुणाव भंडारा टाकून त्याच्या नाकाला बूट लावताना दिसत आहे. यावेळी तो काही मंत्रोच्चार करतानाही दिसून येत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओत हा बाबा तरुणाला झोपवून त्याच्या मानेवर पाय व पोटावर पाय ठेवून उपचार करण्याचे ढोंग करताना दिसून येत आहे. यावेळी तो सोड त्याला सोड त्याला नाही तर दोस्ती घालेन, असे म्हणतानाही दिसून येत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य रितेश संतोष होळकर, जगदीश सोज्वळ यांनी या घटनेचा पर्दाफाश केला.
कोण आहे भोंदू संजय पगार?
भोंदूबाबा संजय रंगनाथ पगार हा पूर्वी लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचे काम करत होता. पण त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्याने तो व्यवसाय सोडला. त्यानंतर गत काही दिवसांपासून तो शिरूर येथील बिरोबा मंदिरात येत होता. मंदिरात आपापल्या समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना शोधून त्यांना तो आपल्या जाळ्यात अडकवायचा. तो लोकांना अघोरी सल्ले देऊ लागला. त्यानंतर त्याने मंदिरात आपला दरबारही भरवण्यास सुरूवात केली. रविवार व गुरूवार असे दोन दिवस तो आपला दरबार भरवायचा. पण आता गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
अंधश्रद्धा ही समाजातील एक गंभीर समस्या आहे. ती वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कसंगत विचारांना आव्हान देते. अनेकदा अज्ञान, भीती किंवा परंपरांवर आधारित अंधश्रद्धा लोकांना चुकीच्या विश्वास व प्रथांमध्ये अडकवतात. यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण व नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, जादूटोणा, भूतपिशाच्च यासारख्या समजुतींमुळे लोक वैद्यकीय उपचारांऐवजी अंधविश्वासांवर अवलंबून राहतात. यामुळे गंभीर आजार बळावतात. याशिवाय, अंधश्रद्धेमुळे सामाजिक भेदभाव व अन्यायालाही प्रोत्साहन मिळते. विशेषतः महिला या प्रकरांना फार बळी ठरतात. ही समस्या दूर करण्यासाठी शिक्षण, जागरूकता व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक आहे, जेणेकरून समाज तर्कनिष्ठ व प्रगतिशील बनू शकेल.