27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने कोकणवासीयांची गावी जाण्यासाठी लगबग सुरु आहे. कोकणातील चाकरमानी या दिवसांमध्ये गावी जाण्यासाठी काय पर्याय निवडता येईल असा विचार करतात. याच दरम्यान चिपळूणवासीयांसाठी प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी २५० विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, मडगावकरिता या गाड्या धावणार असून, २४ जुलैपासून चाकरमानी या गाड्यांचे आरक्षण करू शकतात.
कोणत्या कालावधीत धावणार ट्रेन
सीएसएमटी, एलटीटी या स्थानकांवरून या गाड्या सुटणार आहेत. यात दिवा-चिपळूण- दिवा मेमू अनारक्षित गाडीच्या दररोज ३८ फेऱ्यांचा समावेश आहे. सर्व गाड्यांची सविस्तर माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अवघ्या काही मिनिटांत तिकिटे आरक्षित होत असल्याने यंदा तरी आरक्षण मिळणार का, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.
काय आहे विशेष रेल्वेची अधिसूचना
मध्य रेल्वे मुख्यालयाने सोमवारी ही सूचना जारी केली. अधिसूचनेत असे सांगण्यात आले की २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. यामुळे गणेशोत्सवादरम्यान गर्दी कमी होईल. अधिसूचनेत कोकण रेल्वेचे पत्र आणि रेल्वे बोर्डाची मान्यता देखील उद्धृत करण्यात आली आहे. मध्य रेल्वेची ही सूचना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
२५० गाड्या चालवण्याची घोषणा
मध्य रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांच्या कोचिंग अधिसूचनेनुसार, सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी, सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी, एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी, एलटीटी-मडगाव-एलटीटी, पुणे-रत्नागिरी-पुणे मार्गांवर गाड्या धावतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी काही मार्गांवर दररोज धावतील आणि काही मार्गांवर साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जातील. या मार्गावर एकूण अडीचशे गाड्या धावतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वेची ही अधिकृत सूचना काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.