कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : सहसा काहीतरी वेगळं खाण्यासाठी आवडीच्या हॉटेलची वाट धरली जाते. किंवा काही नव्या ठिकाणांवर जाण्याचा निर्णय होतो. पण, ज्या खाण्यासाठी आपण पैसे देतो त्याच खाण्याची प्रत खालावलेली असेल तर? असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला. पुण्यातील हिंजवडीच्या मारुंजी रोडवरील अरेबियन मंडी हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कायदा आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे दिलेल्या लेखी तक्रारीत, हॉटेलमध्ये आढळलेल्या अस्वच्छतेबरोबरच प्लेटमध्ये सापडलेल्या कोंबडीच्या पिसावरून संताप व्यक्त केला. (Pune News)
नेमकं काय घडलं?
16 जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास प्रदीप नाईक हे अरेबियन मंडी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता, हॉटेलच्या बाहेरपासूनच भोंगळ कारभाराचा अनुभव यायला सुरूवात झाली. पार्किंगची व्यवस्था नसणे, जेवणाची जागा अस्वच्छ असणे, हात धुण्याची सोय उबगवाणी आणि टेबल-खुर्च्यांवर तेलाचे डाग अशी चित्रं पाहायला मिळाली.
नाईक यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, वॉशरूमपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही दर्जाहीन आणि अगदी अस्वच्छ होतं. या अनुभवावर कळस चढवला तो त्यांच्या चिकनच्या प्लेटमधील अनोख्या घटकाने. निजाम चिकन कबाब खात असताना थाळीत चक्क कोंबडीचं पिस सापडलं. हा प्रकार पाहून नाईक यांनी तात्काळ मॅनेजरला बोलावून विचारणा केली. मॅनेजरने हॉटेल मालकाचे नाव सांगितले, पण वाद टाळण्यासाठी “काही बोलू नका, बिल सुद्धा देऊ नका” असा सल्ला दिला. मात्र, नाईक यांनी बिलाचे पैसे स्वतः दिले असून त्यांनी 482 रुपये भरल्याचे स्पष्ट केले.
हेसुद्धा वाचा : ‘महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला…’ मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुषमा अंधारेंचं जळजळीत वक्तव्य
मागील काही काळापासून फक्त पुण्यातीलच हॉटेल नव्हे, तर अनेक खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या स्वच्छतेबाबत आणि तिथं विक्री केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. त्यातूनच कैक किळसवाणे प्रकार पुढे येत असून, राज्यासह देशभरात अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर जातीनं लक्ष दिलं जाण्याची गरज भासू लागल्याचं स्पष्ट होत आहे.