शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निर्लज्ज व्यक्ती अशा विविध उपमा देत आपल्या मनातील संताप व्यक्त केला. आतापर्यंत
.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी आज नियम 293 अन्वये प्रस्ताव मांडला. पण ते भाषण करताना सत्ताधाऱ्यांनी वारंवार अडथळा आणला. त्यावर विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या प्रकारावर आक्षेप नोंदवत सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात पत्रकारांनी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.
मी सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला. त्यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे देण्याचा दंडक आहे. पण प्रस्तावावर बोलताना माझी अडवणूक करण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी आहेत. ते स्वतःलाच सरकार समजतात. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः उत्तरे द्यावीत. ते स्वतःला ज्ञानी समजतात, असे भास्कर जाधव आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.
आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर घसरले
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही सरकार विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसूख घेतले. परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाहा केले ते सर्वांनी पाहिले. म्हणूनच मी हातवारे केले. टाचण्या टोचण्याविषयी. हो केले मी हातवारे. माझ्यावर कारवाई करा. कारण, उपमुख्यमंत्र्यांएवढे नमक हराम, एहसान फरामोश व्यक्ती मी पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असे ते एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले.
मी मिंधेंचे नाव कुठेही घेतले नाही
ते पुढे म्हणाले, आम्ही सभागृहात अनेक मुद्दे व प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगरविकास मंत्री फक्त आणि म्हणून आणि म्हणून (नक्कल करत) बोलले. म्हणूनच मी तोंडावर गद्दार व नमक हराम बोललो. मी मिंधेंचे कुठेही नाव घेतले नाही. पिच्चर वगैरे सर्वकाही खोटे आहे. त्यांना उद्धव ठाकरे सरकारने सर्वकाही दिले. त्यापूर्वी त्यांना कोण ओळखत होते? या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते कधी कुणाला दिले का? पण यांना दिले गेले.
पण यांनी काय केले? गद्दारी. यांना थोडीही लाज वाटत नाही. ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले ते त्याच्यावर आरोप करतात. काही संस्कार झाले आहेत की नाही? त्यांनी डोळ्यात डोळे घालून आरोप करावेत. पण त्यांच्यात ती ही हिंमत नाही. खाली पाहूनच बोलतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना लगावला.
आदित्य ठाकरेंच्या निलंबनाची मागणी
दुसरीकडे, विधानसभेत आज आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर समोरच्या बाकांकडे पाहून हातवारे व इशारे करण्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान हे अध्यक्षांचा अवमान आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या मागणीमुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.
हे ही वाचा…
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा:म्हणाले – डिनो मोरियाने तोंड उघडले, तर अनेकांचा मोरया होईल; मराठी माणसांवरून हाणला टोला
मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत नियम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले. यात त्यांनी मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर मुद्यांवरून विरोधकांना विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलेच खडेबोल सुनावले. मतदानाच्या आधी मराठी – मराठी म्हणायचे आणि निवडून आल्यानंतर कोण रे तू म्हणायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणाले. डिनो मोरियाने मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वाचा सविस्तर