अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटींचा निधी वर्ग: बीडमध्ये उपकेंद्र उभारण्याबाबत प्रयत्न सुरु- नरेंद्र पाटील – Mumbai News



महाराष्ट्र सरकारकडून विविध महामंडळांद्वारे उद्योजक तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाते. मराठा समाजात उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारने मोठा निधी दिला आहे.

.

अर्थसंकल्पात या महामंडळासाठी 750 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या संदर्भातील शासन निर्णय 1 5 जुलै रोजी जारी करण्यात आला असून, या निर्णयानुसार 3 00 कोटी रुपयांचा निधी महामंडळाला वर्ग करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजात नवीन उद्योजक निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद आणि निधी वितरण

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला गती देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी आता 300 कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष वर्ग करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने प्रसिद्ध केला आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटींचा निधी वर्ग झाल्याबद्दल नरेंद्र पाटील यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटींचा निधी वर्ग करण्यात आल्याचा शासन निर्णय सगळ्यांना मिळाला असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो.

या निधी वाटपावर टीका होऊ शकते या शक्यतेवर बोलताना नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार सर्वच महामंडळांना निधी देते. अर्थसंकल्पातील मंजूर निधी टप्प्याटप्प्याने, म्हणजेच 20 टक्के, 30 टक्के, 40 टक्के किंवा 50 टक्के अशा प्रकारे दिला जातो. मिळालेला निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिल्यानंतरच पुढील निधी दिला जातो, असेही पाटील यांनी सांगितले.

मागील वर्षाचा अनुभव आणि भविष्यातील योजना

नरेंद्र पाटील म्हणाले की, आम्हाला 2024-25 या आर्थिक वर्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात 350 कोटी रुपये देण्यात आले. 300 कोटी रुपये लाभार्थ्यांना दिल्यानंतर आणखी निधीची गरज लागल्याने नंतर 50 कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, मराठवाड्यात महामंडळाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली. विशेषतः बीडमध्ये हे उपकेंद्र उभारण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे मराठवाड्यातील उद्योजकांना स्थानिक स्तरावर अधिक सोयी सुविधा मिळतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24