Petition Against Prada Over Kolhapuri Chappal Dispute: इटालीमधील प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरी चप्पलांचा कथित गैरवापर केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. याचिकाकर्त्या सहा वकिलांना ही – जनहित याचिका दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
याचिकाकर्त्यांचा दावा काय?
तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही. मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध? आणि यात जनहित काय आहे, असा प्रश्न मुख्य न्या. अलोक अराध्ये आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. कोल्हापुरी चपलांना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त आहे आणि त्यांच्या डिझाइनचा प्राडाने अनधिकृत वापर केल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
कोर्टाने काय म्हटलं?
या महिन्याच्या सुरुवातीला सदर याचिका दाखल करण्यात आली होती. कोल्हापुरी चप्पल हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक असून, भारतीय कारागिरांचे डिझाइन कॉपी केल्याबद्दल नुकसानभरपाईची मागणी याचिकेत करण्यात आली होती. प्राडाला अनधिकृतपणे टो-रिंग सँडल्सची विक्री न करण्याचे आदेश द्यावेत, त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक माफी मागावी तसेच कारागिरांना नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांचाही याचितकेत उल्लेख करण्यात आला होता.
होता. मात्र, जीआय टॅगचे नोंदणीकृत मालक स्वतः न्यायालयात येऊन दाद मागू शकतात. त्यात इतर कोणीही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. खंडपीठाने याचिका फेटाळत याबाबत सविस्तर आदेश नंतर देऊ, असे स्पष्ट केले.
प्राडाची टीम कोल्हापूरमध्ये
इटलीतील ‘प्राडा’ या कंपनीचे शिष्टमंडळ राज्यात चर्चेसाठी आलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडाच्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासंदर्भात शुक्रवारीच माहिती दिली होती. हे पथक बुधवारी कोल्हापूरमध्ये दाखल झालं. कोल्हापूरमधील चप्पल लाईनला या मंडळातील सदस्यांनी भेट दिली. विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट अधिकारी घेणार आहेत.
‘प्राडा’ची चप्पल राज्यातील प्रेरित असल्याचे मान्य करत मेक इन इंडिया-कोल्हापूर मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्याबाबत इटलीतील या फॅशन ब्रॅण्डने उत्सुकता दर्शवली आहे. ‘प्राडा’ची टीम आणि महाराष्ट्र चेंबरच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी ऑनलाईन बैठक पार पडली. महाराष्ट्र चेंबरने सांस्कृतिक आदान-प्रदान, नाममुद्रा विकास, न्याय व्यापार यावर आधारित मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात ‘प्राडा’ने महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांशी दीर्घकालीन सहकार्य करण्याचा हेतू स्पष्ट केला. कोल्हापुरी वहाणच नव्हे, तर पैठणी, चांदीचे पायल आणि इतर स्थानिक हस्तकला प्रकल्पांवरही सहकार्याचा मानस त्यांनी व्यक्त केल्याचे महाराष्ट्र चेंबूरचे गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. सध्या कोल्हापूरमध्ये 1 लाख कारागीर हे कोल्हापुरी चपलेशीसंबधित व्यवसायात गुंतले असून, त्यांची वार्षिक 1400 ते 1500 कोटी रुपयांची बाजारपेठ आहे.