‘पुणे तिथे गुन्हे! लेकींवर हात टाकताना…’; ‘देवाभाऊं’चा उल्लेख करत हल्लाबोल, ‘अश्लील नजरेने…’


Pune Crime News: “विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत पुणे अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस बोकाळत चाललेली गुन्हेगारी पाहता पुण्याची मूळ ओळखच मिटून जाते की काय, अशी भयावह परिस्थिती हल्ली पुणे शहरात निर्माण झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि गृहखात्याचा पोलिसांवर वचकच न राहिल्याने कधी काळी शांत असलेले पुणे आता कमालीचे अशांत बनले आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार, खंडणी वसुलीच्या घटनांमुळे पुण्यात गुंड टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागांत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढीस लागल्या व त्या भागांत कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचेच राज्य निर्माण झाले. पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारांचा दबदबा वाढला व राजकीय आश्रयामुळे तर गुंडांच्या या टोळ्या मोकाट सुटल्या आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

जनाची वा मनाची तर लाज वाटली नाहीच, पण…

“पुण्याच्या तळजाई टेकडीवरील ताजी घटना तर पुणे पोलिसांसाठी लांच्छनास्पद म्हणावी अशीच आहे. फिटनेस अकादमीचे दीडशे ते दोनशे तरुण-तरुणी रोज तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेकडीवर सरावासाठी आलेल्या तरुणींना सुमारे 50 ते 60 पैलवान गुंडांच्या टोळक्याने धक्काबुक्की केली. सरावाच्या मैदानावर प्रशिक्षणार्थी मुले-मुली पोहोचल्या तेव्हा अगोदरच चार गुंड मैदानात येऊन थांबले होते. इथून बाजूला सरका व आम्हाला सराव करू द्या, अशी विनंती मुलींनी या चौघांना केली असता त्यांनी सरळ या तरुणींना ढकलून धक्काबुक्की शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ अन्य 50-60 पैलवानांचे टोळके तिथे येऊन धडकले. अकादमीतील प्रशिक्षणार्थी मुलांनी या पैलवान टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या लेकींवर हात टाकताना पैलवान गुंडांच्या टोळक्याला जनाची वा मनाची तर लाज वाटली नाहीच, पण पोलिसांचे भयदेखील वाटले नाही,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सरकारमधील लोकच गुन्हेगारांच्या टोळ्यांना वाचवण्याचे काम करत असतील तर…

“गुन्हेगारांच्या मनातील भीती संपुष्टात येणे हे पोलीस प्रशासनाचे व पर्यायाने राज्याच्या गृहखात्याचे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. पुण्यातील ‘भाईगिरी’ का वाढतेय, याचे उत्तर गृहखाते सांभाळणाऱ्या ‘देवाभाऊंना’ नाही तर कुणाला विचारायचे? बरे, एवढे सगळे घडल्यानंतरही पुणे पोलिसांनी गुंड टोळक्याविरुद्ध तत्काळ कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस स्वतःहून तर घटनास्थळी आले नाहीच, पण विनयभंग, मारहाण, शिवीगाळ याची तक्रार घेऊन सहकार नगर पोलीस ठाण्यात गेलेल्या मुला-मुलींची पोलिसांनी साधी दखलही घेतली नाही. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडूनही पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. अखेर या मुला-मुलींनी पोलीस आयुक्तालयात धडक दिली. मंगळवारी सकाळी 8 वाजता घटना घडलेली असतानाही सायंकाळी 7 नंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. धक्कादायक गोष्ट अशी की, या गुंडगिरी करणाऱ्या टोळक्याविरुद्ध कारवाई करू नये, यासाठी थेट मंत्रालयातूनच पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता, अशी माहिती आता पुढे येत आहे. सरकारमधील लोकच अशा पद्धतीने गुन्हेगारांच्या टोळ्यांना वाचवण्याचे काम करत असतील तर पोलिसांना तरी दोष देऊन काय उपयोग?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

‘देवाभाऊं’चे गृहखाते पुण्यातील

“सरावाच्या वेळी हे गुंड पैलवान अश्लील नजरेने पाहतात, अनेकदा असभ्य शेरेबाजी करतात, फेसबुक व इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यासाठी धमकी देतात, रोज घरापर्यंत पाठलाग करतात अशी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुलींची गंभीर तक्रार आहे. मात्र विनयभंगाच्या फिर्यादीसह एवढ्या गंभीर तक्रारी असतानाही सहकार नगर ठाण्याचे पोलीस या मुलींऐवजी गुन्हेगारांना सहकार्य करत राहिले. गुन्हेगारांविरुद्ध तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मोकळीकच पोलिसांना नसल्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुण्यात सात नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत. मात्र राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार पोलीस गुन्हेगारांच्याच पाठीशी उभे राहत असतील तर नवीन कितीही पोलीस ठाणी सुरू झाली तर त्याचा काय उपयोग? तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुला-मुलींवर गुंड टोळक्याने केलेला हल्ला हा सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या पुण्याची इभ्रत घालवणारा आहे. ‘पुणे तिथे काय उणे?’ असे पूर्वी पुणेकर अभिमानाने म्हणायचे. मात्र अलीकडच्या काळात पुण्यात वाढलेली गुन्हेगारी पाहता ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’, असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. ‘देवाभाऊं’चे गृहखाते पुण्यातील ही ‘भाईगिरी’ संपवणार आहे काय?” असा सवाल शेवटी विचारण्यात आलाय.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24