देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला आगामी २६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ११ जुलैपर्यंत प्रवेश, १३ जुलैला प्रवेशित विद्यार्थ्यांची घोषणा आणि १६ जुलैपासून प्रत्यक्ष वर्ग सुरु केले जाणार होते.
.
मोर्शी तालुक्यातील महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळख असलेल्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सज्ज झाले आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून येथे पहिल्या सेमिस्टरचे वर्ग भरवले जाणार आहेत. पहिल्या वर्षीपासून पदवीसाठी (बीए) आठ तर पदव्युत्तर पदवीसाठी (एमए) सहा अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या १ जुलैपासून प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहेत. दरम्यान सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे अधिव्याख्याते, सहायक अधिव्याख्याते आणि इतर कर्मचारी यांची जुळवाजुळवही करण्यात आली आहे.
एमएसाठी मराठी समाजभाषा विज्ञान व बोलीविज्ञान, मराठी अनुवादशास्त्र, मराठी अभिजात भाषा व वाड्मय, मानसशास्त्र, भूगोल (नैसर्गिक संसाधने व पर्यावरण यासह) हे पाच विषय असून मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्ससाठी (एमपीए) संगीत हा विषय निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पदवी अभ्यासक्रमासाठी मराठी (भाषा व लिपीशास्त्र), जर्मन भाषा, रशियन भाषा, इंग्रजी भाषा हे चार विषय ठेवण्यात आले असून या विषयांत विद्यार्थ्यांना बी.ए.ची डिग्री मिळेल. या विषयांसोबतच नाटक आणि रंगभूमी व संगीत या दोन विषयात बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स तर पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन या विषयात बीटीटीएम आणि पर्यावरण व्यवस्थापन या विषयात बीइएम ही पदवी दिली जाणार आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना ०७२१-२९९०१८६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
‘इग्नू’चे प्रवेश आता ३१ पर्यंत
मराठी भाषा विद्यापीठासोबतच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. या विद्यापीठाचे प्रवेश १५ जुलैपर्यंतच करावयाचे होते. परंतु विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदवाढ दिल्याचे स्थानिक समन्वयक गजानन पंचवटे यांनी कळवले आहे.