राज्य सरकारने महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबतचा पगार मागील 8 वर्षांपासून रोखल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी राहीने वारंवार प्रशासनाकडे विचारणा केली, पण त्याला न्याय मिळाला नाही. क्रीडा क्षेत्रात देशाची मान उंचावणाऱ्या
.
राही सरनोबत एक आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानामुळे सरकारने 2014 साली तिची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर तिला सुरुवातीची 3 वर्षे नियमित वेतन मिळाले. पण त्यानंतर प्रशिक्षणाची 3 वर्षे पूर्ण न केल्यामुळे तिचे वेतन रोख्यात आले. मागील 8 वर्षांपासून तिला वेतन देण्यात आले नाही. राहीने 2008 मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळविले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. त्यानंतरही प्रशासनाने तिचे वेतन रोखल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
अजित पवारांची घेतली भेट
विशेष म्हणजे राही सरनोबत ही वेगवेगळ्या स्पर्धांत भारतीय संघाचा भाग राहिली आहे. खेळाडू म्हणून व्यस्त असल्यामुळे तिला प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. ही बाब स्वतः राही व तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाच्या कानावर घातली. पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. राहीने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबीयांसह अजित पवारांची घेत भेटली होती. त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या होत्या. वेतनाअभावी राही आर्थिक संकटात सापडली आहे. तिला कोणत्याही बँकेचे लोन घेता येत नाही. याचा परिणाम तिच्या खेळावर होत आहे.
विधानसभेत अमित गोखलेंनी मांडला मुद्दा
दुसरीकडे, जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूचे वेतन थकीत असल्याचा मुद्दा आमदार अमित गोखले यांनी सोमवारी विधान परिषदेत मांडला. त्यानंतर मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला पगार काढण्यासोबत सेवेत नियमित करण्याचे आदेश देण्याचे निर्देश दिलेत. या मुद्यावर बोलताना राहीने सांगितले की, मी दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या प्रकरणी भेट घेतली. त्यांनी यासंदर्भात आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता हा प्रश्न मार्गी लागेल असा मला विश्वास आहे.
कोण आहे राही सरनोबत?
राही सरनोबत ही एक आंतरराष्ट्रीय नेमबाज आहे. तिचा जन्म 30 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल 2018 रोजी सरकारने तिचा अर्जुन पुरस्काराने सन्मान केला होता. राहीने 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती 2016 च्या रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती. पण दुखापतीमुळे तिला खेळता आले नव्हते. तत्पूर्वी, 2008 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत राहीने पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने 2 सुवर्णपदक जिंकले.