Aaditya Thackeray On Nitesh Rane: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून मुंबई येथे सुरू झाले असून 18 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, पुरवणी मागण्या आणि ‘विकसित महाराष्ट्र @2047’ साठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यावर चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर भर दिलाय. तसेच, मेळघाटसारख्या भागात पाणीपुरवठ्यासाठी बंधारे बांधण्यासारख्या स्थानिक समस्यांवरही चर्चा झाली. विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. दरम्यान विधानभवनांच्या पायऱ्यांबाहेर कट्टर राजकीय विरोधक आदित्य ठाकरे आणि नितेश राणे समोरासमोर येता येता राहिले.
आरोप-प्रत्यारोप
आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील वाद 2025 मध्ये राजकीय आणि वैयक्तिक टीकांमुळे चर्चेत राहिला. हे वाद प्रामुख्याने दिशा सालियन प्रकरण, राजकीय युती आणि विधानसभेतील वक्तव्यांभोवती केंद्रित आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. दिशा सालियन यांची हत्या झाली असून, यामागे पुरावे गायब करण्यात आले, असा दावा नितेश राणेंनी केला. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरे यांच्यावर FIR दाखल करण्याची आणि प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी हे आरोप त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत कोर्टात आपली बाजू मांडण्याची तयारी दर्शवली. पोलिसांनी मात्र दिशा सालियन यांचा मृत्यू अपघाती असल्याचा युक्तिवाद केला. यानंतर आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला.
नेमकं काय घडलं?
राजकीय मतभेद, वैयक्तिक टीका आणि दिशा सालियन प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील वाद तीव्र झालाय. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर विधानसभेत आणि सोशल मीडियावर आक्रमक टीका केलीय. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण पाहायला मिळाला. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आलाय. नितेश राणे एका ठिकाणी मीडियाशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे त्या बाजूला येताना दिसतायत. तिकडे नितेश राणे आहेत, असे त्यांना कोणीतरी सांगत. आणि त्यानंतर आदित्य ठाकरे शी, शी म्हणत मागे वळतात. यानंतर आदित्य ठाकरेंसोबतचे नेतेही त्यांच्यासोबत मागे जाताना दिसतात.
आदित्य ठाकरे आक्रमक
आदित्य ठाकरेंची ओळख ही शांत, संयमी अशी असली तरी गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. जुलै 2025 मध्ये विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी ‘चड्डी-बनियन गँग’चा उल्लेख करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत आदित्य यांना ‘ही गँग कोणती आहे, स्पष्ट करा’ असा सवाल केला आणि त्यांना नाव घेण्याचे आव्हान दिले. या खडाजंगीने सोशल मीडियावरही मोठी चर्चा पाहायला मिळाली.
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका
शिवसेना (UBT) आणि मनसे युतीच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. त्यांनी युतीला ‘कौटुंबिक मनोमिलन’ म्हणत उपहासात्मक टिप्पणी केली आणि ‘नवरा कोण, नवरी कोण?’ असा प्रश्न विचारत राणेंनी ठाकरे बंधुंच्या भेटीची खिल्ली उडवली. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत नितेश राणे यांचा उल्लेख ‘पेंग्विनची उंची, बदकाची चाल आणि कोंबडीचा आवाज’ असा करत प्रत्युत्तर दिले. नोव्हेंबर 2024 मध्ये शिवसेनेने (UBT) नितेश राणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्याबाबत खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप केला. यासाठी शिवसेनेने नितेश राणे यांच्या X अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती.