Raj Thackeray Meeting Fadnavis Eknath Shinde: “वरळीच्या ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यानंतर भाजप व शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या भूमिका मनोरंजक आहेत. राज ठाकरे यांची भूमिका मराठीबाबत एकदम योग्य, पण उद्धव ठाकरे यांच्या त्याच भूमिकेवर दोघांनी टीका केली. ती टीका सुरूच आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेली ही पोटदुखी सरळ दिसते,” असा टोला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. “एक कार्यक्रम, एक मंच. दोन भाऊ एकत्र आले, त्यात एक बरा व दुसरा चुकीचा असे बोलणारे स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे त्या दिवशी काढत होते,” असं राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीचे मन साफ नाही
“मीरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांच्या मुजोरीविरुद्ध मराठी लोकांनी प्रचंड मोर्चा काढला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले मंत्री प्रताप सरनाईक यांना लोकांनी पळवून लावले. या मोर्चाच्या गर्दीत व आयोजनात शिवसेना होती, पण मुख्यमंत्री फडणवीस ‘मनसे’चे नाव घेत राहिले व शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले. त्यामागचा कावा अनाजीपंतांचा आहे व तो दोन्ही ठाकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीचे मन साफ नाही, हेच त्यातून दिसले,” असा टोला राऊतांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’मधून लगावला आहे. “आपण राज्याचे मुख्यमंत्री झालो म्हणजे या राज्यातील लोकांना सर्व तऱ्हेची अक्कल शिकविण्याची परवानगी आपल्यालाच मिळाली अशा थाटात ते रोज बोलत असतात. पुन्हा त्यांचे बोलणे वकिली पद्धतीचे असते. हे वकील कसे? न्यायमूर्ती खिशात व दबावाखाली असल्यामुळेच यांची वकिली (फिक्सिंग) सध्या चालली आहे,” असा टोमणा राऊतांनी लगावला आहे.
फडणवीस ‘विदर्भ हेच माझे राज्य’ असे फलक घेऊन…
“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खरोखरच प्रेम आहे, असे गृहीत धरले तरी त्यांचे हे प्रेम या राज्यातील मराठी माणसांना खरे वाटत नाही हे त्यांना माहीत आहे काय? कधीकाळी हेच फडणवीस ‘विदर्भ हेच माझे राज्य’ असे फलक घेऊन नागपुरात आंदोलन करीत होते हे लोक विसरलेले नाहीत. मराठी माणूस, मराठी एकजूट हा देखावा त्यांनी ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून उभा केला आहे. फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आंदोलन पद्धतशीर संपवले व छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन ओबीसींनाही थंड केले. याच काव्याने हे महाशय मराठी एकजुटीलाही खिंडार पाडतील असे त्यांचेच लोक उघडपणे बोलू लागले आहेत,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
स्वतः राज ठाकरेच समोर येऊन…
“शिंदे, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात. राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात. शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात. शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत व या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही. एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की,” अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे.