उबाठा सेना व संजय राऊत यांना तुकडे गँगची चिंता असल्यामुळेच ते महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहेत, अशी टीका भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
.
विधानसभेने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विधेयकाला विरोध केला आहे. सरकारने जनसुरक्षा विधेयक बहुमताच्या जोरावर विधानसभेत पारित केले. पण या विधेयकातील काही तरतुदींना आमचा विरोध आहे. सरकारच्या कथनी व करणीत फरक आहे. सरकार नक्षलवाद व माओवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक हवे असल्याचा दावा करत आहे. पण या विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा माओवादाचा उल्लेख नाही. सरकार हे विधेयक राजकीय हेतूने आणत असेल तर आमचा त्याला विरोध आहे, असे उद्धव ठाकरे या विधेयकाला विरोध करताना म्हणाले होते.
ठाकरे विधानपरिषदेत का बोलले नाही?
आशिष शेलार यांनी शनिवारी या प्रकरणी भाजपची भूमिका स्पष्ट करत ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. जनसुरक्षा कायदा हा कुणालाही जाच, अडचण, त्रास देण्यासाठी नाही. कोणत्याही पक्षाला, संघटनेला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा कायदा नाही. कोणत्याही विचारधारेला मर्यादा घालण्यासाठीचा हा कायदा नाही. विरोधी पक्ष फेक नरेटिव्हचा वापर करत लोकांमध्ये भ्रम पसरविण्याचे काम करत आहेत. लोकांमध्ये भीती पसरवा आणि मतं मिळवा अशी विरोधी पक्षांची रणनिती आहे. उबाठा सेना आणि हे संजय राऊत हे शरजिल उस्मानी, उमर खालिद आणि तुकडे तुकडे गँगच्या चिंतेपोटी बोलत नाहीत ना? हा आमच्या मनात प्रश्न आहे.
जनसुरक्षा कायदा हा विधानपरिषदेत चर्चेसाठी आला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे का बोलले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आधी द्यावं. मग इतर याद्या मागाव्यात, असे ते म्हणाले.
मराठीवरून ठाकरे कुटुंबाच्या काढल्या 3 पिढ्या
आशिष शेलार यांनी यावेळी मराठीच्या सक्तीमुळेच ठाकरे कुटुंबीयांच्या आत्ताच्या पिढीने 3 भाषा शिकल्याचीही उपरोधिक टीका केली. राज्य सरकारच्या शासन निर्णयाच्या विरोधात जाण्याची कुणालाही मुभा नाही. तसे झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रातील आयीएसी, सीबीएससी, केंब्रीज, आयबी बोर्डाच्या शाळांमध्ये आपण जो मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतला, त्यामुळे येथे मराठी भाषा शिकवल्या जात आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांच्या आत्ताच्या पिढीने या तीन भाषा शिकल्या आहेत, असे ते म्हणाले.
राज ठाकरेंचे मानले आभार
शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे. आशिष शेलार यांनी याविषयी त्यांचे आभार मानले. मी राज ठाकरे यांना मनापासून धन्यावाद देतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नांना व छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या सर्व गडकिल्ल्यांना समर्थन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ याच ११ किल्ल्यांवर नाही तर सर्वच किल्ल्यांवर तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी हा शासन निर्णय आम्ही केला. यातील अनेक अनधिकृत बांधकामं ही निष्कासित झाली आहेत. शिवप्रेमी व दुर्गप्रेमींच्या या मागणीसाठी शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागले आहोत, असे शेलार म्हणाले.