Sanjay Raut Latest News: पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना हवा मिळाली. दरम्यान, शिंदे आणि शाह यांच्या भेटीबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे.
‘लोकमत’चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर दिसले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिला दिल्ली दौरा राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या भेटीबद्दल खासदार संजय राऊत यांनी एक दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी अमित शाह यांची भेट घेतल्यावरून राऊतांनी डिवचले.
संजय राऊत शिंदे-शाह भेटीबद्दल काय बोलले?
राऊतांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले, दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल, यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच.”
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी…— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2025
शिंदे-शाह भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत एकत्र आले, तर काय परिणाम होतील? याबद्दल चर्चा झाली. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीसंदर्भात जनमताची चाचपणी करण्यासाठी भाजपने एक सर्वेक्षण केले आहे, त्याबद्दल शाहांनी शिंदेंसोबत चर्चा केली.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले गेले, तर हिंदी मतदार महायुतीच्या बाजूने येईल का? मुंबई महानगर प्रदेशात असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या विरोधात आणखी कोणत्या पक्षांना, नेत्यांना सोबत घेता येऊ शकते, याबद्दल उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.