Mumbai Mega Block: मध्य आणि पश्चिम रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभाल तसेच ओव्हर हेड वायर या अभियांत्रिकी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर काय होणार परिणाम?
मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 1.30 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील सर्व वाहतूक ही डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही प्रमाणात लोकल सेवा विस्कळीत होऊ शकतात.
हार्बर मार्गावर कसा असेल ब्लॉक?
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान, या ब्लॉक दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत.
या मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान काही विशेष लोकल देखील चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे जर प्रवाशांना पनवेलला जायचे असेल तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत लोकलने प्रवास करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
सांताक्रूझ ते गोरेगाव या दरम्यान अप जलद आणि पाचव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 12.30 वाजता सुरु होणार असून ते रविवारी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान बंद होईल. या ब्लॉकच्या वेळेत गोरेगाव-माहीम रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व लोकल या धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.