सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथे वीज कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून दोघांना एक वर्ष कारावास व प्रत्येकी १० हजार ५०० रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी.
.
याबाबत जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या महावितरण कंपनीचेे तत्कालीन अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक शिंदे हे ता. २० मार्च २३ रोजी सेनगाव तालुक्यातील वाढोणा शिवारात तपासणीसाठी गेले होते. यावेळी वाढोणा शिवारातील शिवस्टोन क्रेशर येथे तपासणी केली असता त्याठिकाणी वीज चोरी केली जात असल्याचे दिसून आले. यावेळी त्या ठिकाणी असलेले माणकेश्वर देशमुख (रा. पानकनेरगाव) व मोतीराम ढोले (रा. वाढोणा) यांनी शिंदे यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यानंतर महावितरण कंपनीने वीज चोरीबाबत तडजोडीची ९.६० लाख रुपयांच्या देयकाचा भरणा करण्याबाबत कळविले असता त्याचा भरणा केला नाही.
त्यानंतर शिंदे यांच्या पथकाने मिटर काढण्यास सुरवात केली असता दोघांनी त्यांना मारहाण करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अभियंता शिंदे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने अधिक तपास करून हिंगोलीच्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. प्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माणकेश्वर देशमुख, मोतीराम ढोले यांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून एक वर्ष कारावास व प्रत्येकी १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. एस. डी. कुटे यांनी काम पाहिले त्यांनाी ॲड. सविता देशमुख यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून सेनगाव पोलिस ठाण्याचे जमादार पी. ए. मारकड यांनी काम पाहिले.