FIR Against Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकऱणी आमदार संजय गायकवाडांविरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय. संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंबलेली डाळ दिल्यानं आमदार संजय गायकवाडांचा संताप झाला आणि त्यांनी थेट कॅन्टीन चालकाला मारहाण केलीय. त्यावरून वाद झाल्यानंतर अखेर संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
मारकुटे आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई
अदखलपात्र गुन्ह्यामुळं विरोधक असमाधानी
आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तब्बल तीन दिवसानंतर शिवसेनेच्या फायटर आमदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या तीन दिवसांपासून संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधक करत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणात तक्रारदार नसल्यानं गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याचं सांगून एकप्रकारे गायकवाड यांची पाठराखण केली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेला दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र फेटाळून लावला. तक्रारदार असो किंवा नसो, मारहाणीच्या प्रकरणात कारवाई होणारच असे स्पष्ट संकेत आणि आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी गुन्ह्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर गेले तीन दिवस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारी यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी अवघ्या तासा दिडतासांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असला तरी यानं विरोधकांचं समाधान झालेलं नाही. सत्ताधारी आमदार खुलेआम मारहाण करतो आणि त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल कसा होतो असा आक्षेप विरोधकांनी नोंदवलाय. संजय गायकवाड माफी मागत नव्हते, केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चातापही होत नव्हता. अशावेळी उशिरा का होईना सरकारनं गायकवाड यांच्यावर कारवाई करुन योग्य संदेश गायकवाड यांना दिलाय.